

अनिल देशमुख
कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आता आयआयटी मद्रासची मदत घेतली जाणार आहे. एआयचा वापर करून कार्यरत असलेल्या ॲपद्वारे अपघातांच्या विश्लेषणासोबतच अपघाताची तत्काळ माहिती मिळवणे, उपाययोजना करता येणे जिल्हा प्रशासनाला शक्य होणार आहे.
पुणे-बंगळूर महामार्गासह गोवा आणि कोकणात जाणारे मार्ग यांसह जिल्ह्यातील प्रमुख मार्ग असे जिल्ह्यात रस्त्यांचे मोठे जाळे आहे. जिल्ह्यातील काही मार्गांची रुंदी वाढत आहे, मजबुतीकरणही केले जात आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही अनेक रस्त्यांवरील काही ठिकाणे अपघाताला निमंत्रण देत आहेत.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार अपघात होण्याच्या प्रमाणात राज्यात कोल्हापूरची परिस्थिती चिंता वाढवणारीच आहे. जिल्ह्यात सध्या ४६ ब्लॅकस्पॉट आहेत. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ५३३ अपघातांत जिल्ह्यात २२३ जणांचा मृत्यू झाला. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे.
जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या कारणांचा शोध घेणे, त्यावर उपाययोजना करणे, त्याद्वारे अपघातांच्या प्रमाणांवर नियंत्रण आणणे, अपघाताची तत्काळ माहिती उपलब्ध होणे, त्याद्वारे जखमींना मदत देण्यापासून ते आवश्यक तातडीच्या उपाययोजना करण्याबाबतच्या सर्व बाबींसाठी आता आयआयटी मद्रासच्या सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर रोड सेफ्टी या उपक्रमांतर्गत संजया ॲपची निर्मिती केली आहे. त्याचा वापर जिल्ह्यात केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात या ॲपमध्ये रस्ते सुरक्षितता आणि अपघात याबाबत संबंधित सर्व विभागांची माहिती संकलित केली जात आहे. यानंतर या ॲपद्वारे माहितीचे विश्लेषण करून उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत.