

Ichalkaranji Voting Percentage
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.१५) सकाळी ७.३० वाजता शहरातील 302 मतदान केंद्रांवर उत्साहात मतदानास सुरुवात झाली. 16 प्रभागांतील 65 जागांसाठी मतदान होत आहे. काही ठिकाणी सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.
पहिल्या दोन तासांमध्ये 7.88 टक्के तर त्यानंतर दोन तासात ते 18.57 टक्क्यावर मतदान झाले. त्यामध्ये 24 हजार 886 पुरुष, 21 हजार 337 महिला आणि इतर 1 अशा 46 हजार 224 मतदारांनी मतदान केले होते. प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली असली तरी मतदार यादीतील गोंधळ, बूथ क्रमांकांची झालेली बदलाबदली आणि माहितीअभावी अनेक ठिकाणी मतदारांचा गोंधळ उडत होता.
काही उमेदवारांनी मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी बूथवर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली होती. तर काही ठिकाणी मतदारांना केंद्र शोधताना धावपळ करावी लागत आहे. एकावेळी चार मते द्यायची असल्याने आणि चार मतदान केल्याशिवाय मत अधिकृत होत नसल्याने मतदानास वेळ लागत असून, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक दोन दोन मशीनमुळे गोंधळलेले दिसत आहेत.
शहरातील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह जवळील डीकेटीई शाळा आणि तांबे माळ परिसरातील शाळेसमोर या केंद्रासमोर मोठी गर्दी जमली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या राखीव तुकडीने तेथे धाव घेत जमावाला पांगवले.
दरम्यान, एका केंद्रावर थेट केंद्रप्रमुखांकडूनच मतदारांना चिन्हाची माहिती देऊन मतदान करण्याचे आवाहन करत असल्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात पैसे वाटप केले जात असल्याच्या कारणावरून दोन उमेदवारांच्या समर्थकांत जोरदार वादावादी झाली. काही ठिकाणी थेट रांगा लावून मतदारांची नावे लिहुन घेत जोरदार लक्ष्मी दर्शन घडत असल्याचे चित्र दिसून येत होते.