

संदीप बिडकर
इचलकरंजी : वस्त्रनगरीच्या पहिल्या महापालिकेतील वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांनी व आघाड्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. गेले कित्येक दिवस प्रचाराचा धुरळा शहरभर उठला आहे. 16 प्रभागांमध्ये सुमारे 230 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. परंतु यामधील डझनभर उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही काहीजण कुटुंबासह निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या शहराचे जणू आपण मालकच आहोत, या आविर्भावात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कल देणार, हे आगामी काळात समजणार आहे.
महापालिका निवडणुकीत किमान 230 उमेदवारांपैकी डझनभर किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार हे सध्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. काहींच्यावर ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. काहीजण खंडणीबहाद्दर आहेत. मर्डर, हाफ मर्डर हा अनेकांचा व्यवसाय आहे. गर्दी मारामारी असे गुन्हे असणार्यांनीसुद्धा उमेदवारी दाखल केली आहे. तसेच अनेक प्रभागामध्ये गंभीर, अतिगंभीर आरोप असणारे निवडणूक रिंगणात आहेत. अनेकांच्यावर केसेस दाखल झाल्या आहेत. पण दोषी ठरवून एखाद्या संशयित आरोपीला किमान दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल किंवा एक लाखापेक्षा जास्त दंड झाला असेल तरच तो निवडणुकीस अपात्र ठरतो, असा नियम आहे. परंतु तसा प्रकारच घडू न दिल्याने हे सर्वजण निवडणूक रिंगणात आहेत. आपसुकच त्यांचा दबदबा वस्त्रनगरीतील प्रभागामध्ये आहे. याचा फायदा घेऊन हे सर्व आपले नशीब याठिकाणी आजमावत आहेत.
वस्त्रनगरीची स्थापना झाल्यापासून खूप चांगल्या पद्धतीने काम झाल्याने कष्टकर्यांची नगरी एक वेगळ्या उंचीवर उभारली आहे. परंतु भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीची वाढ होऊन ते जर नगरसेवक म्हणून महापालिकेत आले तर प्रत्येक कामाच्या निविदा (टेंडर) हे आपले सगेसोयरे किंवा पंटर लोकांनाच देणार आणि त्याचा मलिदा स्वत: खाणार आणि त्यामुळे वस्त्रनगरीतील पूर्णपणे काम निकृष्ट दर्जाचे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आत्तापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना रोखण्याची जबाबदारी ही मतदारराजाने बजावावी, अशी भावना वस्त्रनगरीतील जाणकार मतदारांनी व्यक्त केली आहे.