कोल्हापूर-सांगली महामार्ग आणखी किती बळी घेणार?

कोल्हापूर-सांगली महामार्ग आणखी किती बळी घेणार?

जयसिंगपूर, संतोष बामणे : सांगली-कोल्हापूर महामार्ग हा अपघातांचा महामार्ग ठरत आहे. सोमवारी हातकणंगलेत तिघांचा बळी गेला, तर 2 दिवसांपूर्वी तमदलगे व जैनापूर येथे दोघांचा बळी गेला. चार दिवसांत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या महामार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शिरोली ते उदगावपर्यंतचा रखडलेला रस्ता तातडीने करणे आवश्यक आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या कामाला 20 ऑक्टोबर 2012 रोजी सुरुवात झाली. हे काम 19 ऑक्टोबर 2014 पर्यंत पूर्ण करणे गरजेचे होते. याला 2 जानेवारी 2015 पर्यंत अशी 75 दिवसांची मुदतवाढ मिळाली. हा रस्ता सांगली ते शिरोली असा 52.61 कि.मी.चा होता. मात्र, कंपनीने काम अर्धवट ठेवल्याने या महामार्गाला अवकळा निर्माण झाली. सध्या या महामार्गात हातकणंगले, जयसिंगपूर, तमदलगे, अतिग्रे व उदगावच्या हद्दीत महत्त्वाची कामे अपूर्ण राहिल्याने आतापर्यंत 200 हून अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे.

रस्त्याच्या दुतर्फा झाडे, साईडपट्टीतील खड्डे, धोकादायक बाह्य वळणे, पांढर्‍या पट्ट्यांचा अभाव आणि सूचना फलक यासह विविध उपाययोजनांअभावी प्रवाशांचे बळी जात आहेत.

रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गातील शिरोली ते उदगावपर्यंत 33 कि.मी. रस्त्यासाठी दिवाळीनंतर प्रात्यक्षात सुरुवात होणार आहे. सध्या चोकाक (ता. हातकणंगले) पर्यंत भूसंपादनाचे काम सुरू आहे. उर्वरित चोकाक ते उदगावपर्यंतचे भूसंपादन झाले नाही. हा महामार्ग 13 वर्षांपासून चर्चेत आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग अंकली (ता. मिरज) पर्यंत पूर्ण झाला आहे, तर रत्नागिरी ते केर्लेपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. केर्ले-शिये ते चोकाकपर्यंत भूसंपादन झाले आहे, तर चोकाक ते उदगावपर्यंतचे काम 'जैसे थे' आहे.

सहा महिन्यांत 21 जणांचा बळी हातकणंगले : पोपटराव वाकसे

हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये सहा महिन्यांमध्ये 25 अपघात झाले आहेत, तर 21 जणांचा बळी गेला आहे.

हातकणंगले येथील इचलकरंजी फाट्यावर गुरुवारी मध्यरात्री खड्ड्याचा अंदाज न आल्याने टँकर रस्त्याकडेला असलेल्या चहा, चायनीज व वडापावच्या टपरीत शिरला. यामध्ये बारा लाखांचे नुकसान झाले. शुक्रवारी दोन मोटारसायकलस्वार तेथेच ओढ्यात गेले. सोमवारी सायंकाळी भरधाव एस.टी. बसने रामलिंग दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या रिक्षाला जोराची धडक दिल्याने चौघांचा बळी गेल्याने वारंवार अपघात होणारा हा रस्ता पूर्ण होणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news