Sangeetsurya Keshavrao Bhosale Natyagruha : तळपत्या इतिहासाचे नाट्यगृह

असे उभारले होते कोल्हापूरचे 'केशवराव भोसले नाट्यगृह'
Sangeetsurya Keshavrao Bhosale Natyagruha History
कोल्हापूरचे प्रसिद्ध केशवराव भोसले नाट्यगृह Facebook
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाट्यप्रेमींसाठी हक्काची जागा म्हणजे 'संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह'. कोल्हापूरच्या इतिहासातील असंख्य मातब्बर कलाकार आणि कलाप्रेमींची अविस्मरणीय आठवण म्हणजे हे थिएटर. पूर्वी त्यास 'पॅलेस थिएटर' म्हटलं जायचं. नंतर 'केशवराव भोसले नाट्यगृह' असं नामकरण झालं. ८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री या नाट्यगृहाला आग लागल्याचे समजल्यानंतर समस्त कोल्हापूरकरांच्या आणि कलेवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दाटून आल्या. इतर नाट्यगृहांपेक्षा वेगळं आणि ऐतिहासिक वास्तूरचना असणारं थिएटर आगीच्या भक्षस्थानी पडलं. नाट्यगृहाची रचना जुन्या काळातील होती, जिथे प्रवेश केल्यानंतर प्रेक्षकांचे हृदय अभिमानाने फुलून येत असे. मंचावर सादरीकरण करणारे नाटककार ते पडद्यामागे राबणारे हात हे भोसले नाट्यगृहाचे साक्षीदार आहेत. नाट्यगृह उभारण्यामागील इतिहास रंजक तर आहेच, पण कोल्हापूरच्या इतिहासात तो कोरून ठेवला गेलाय...(Sangeetsurya Keshavrao Bhosale Natyagruha)

असे उभारले 'केशवराव भोसले नाट्यगृह'

शाहू महाराज १९०२ रोजी परदेशात गेले होते. त्यावेळी त्यांनी रोमला भेट दिली. तेथे त्यांना कुस्ती मैदान आणि नाट्यगृह दिसले. तशी योजना त्यांनी आखली आणि आपल्या कोल्हापूर संस्थानात अंमलातही आणली, असा संदर्भ लेखक बाबुराव धारवाडे यांच्या 'जुनं कोल्हापूर' या पुस्तकात सापडतो.

थिएटर पॅलेस कसा उभा राहिला, याबाबत धारवाडे यांनी त्यांच्या पुस्तकात माहिती दिली आहे. शाहू महाराज भारतात परत आले. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी खासबाग परिसर पाहिला. खासबाग मैदानासाठी आणि थिएटरसाठी ही जागा योग्य असल्याचे निश्चित होताच याठिकाणी कुस्तीचे मैदान आणि पॅलेस थिएटर उभारण्याचे ठरवले. पॅलेस थिएटरचा प्लॅन कागलचे ओव्हरसियर जिवबा कृष्णाजी चव्हाण यांच्याकडून त्यांनी करून घेतला. १९१३ साली पॅलेस थिएटरच्या बांधकामाला सुरुवात झाली. १९१५ रोजी बांधकाम पूर्ण झालं. १४ ऑक्टोबर, १९१५ च्या दसऱ्याला युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते उद्घाटन समारंभदेखील झाला.

सागवानी फळ्यांनी सजवून थिएटरची रचना अशी करण्यात आली की, शेवटी बसलेल्या प्रेक्षकांनाही नाटक चांगले दिसावे. थिएटरमध्ये आवाज घुमू नये म्हणून मंचाखाली विहिरीएवढी खोली तयार करून त्यावर या जाड सागवानी फळ्या टाकण्यात आल्या होत्या. असे जुने जाणकार सांगायचे. राजाराम कॉलेजच्या गॅदरिंगसाठी एकदा राजगोपालाचारी आले होते. त्यांनीही नाट्यगृहाच्या रचनेचे कौतुक केले होते.

पॅलेस थिएटरमधील पहिले नाटक 'मानापमान"

किर्लोस्कर कंपनीच्या 'मानापमान" या नाटकाच्या सादरीकरणाने थिएटरचे शुभारंभ झाले. नाट्य प्रयोगावेळी घडलेला प्रसंग धारवाडे यांनी पुस्तकात मांडला आहे. त्यावेळी नाटककार राम गणेश गडकरी आणि नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर तिथे उपस्थित होते. ते दोघे संध्याकाळच्या वेळी खासबागेत बसले होते. त्याचवेळी गडकरींना "राजसंन्यास" नाटकाची कल्पना सुचली होती.

अन् 'पॅलेस थिएटरचे' नामकरण झाले 'केशवराव भोसले नाट्यगृह'

बाळासाहेब देसाई बांधकाम मंत्री झाल्यावर (१९५७) पॅलेस थिएटरचे 'नामकरण केशवराव भोसले नाट्यगृह' करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत केशवराव भोसले नाट्यगृह नावानेच ते प्रसिद्ध आहे.

'या' कलावंतांच्या कलेचे साक्षीदार केशवराव भोसले नाट्यगृह

''बालगंधर्व, केशवराव भोसले, मास्टर दत्ताराम, बाबुराव पेंढारकर, अरुण सरनाईक, प्रभाकर पणशीकर, काशीनाथ घाणेकर, लालन सारंग-कमलाकर सारंग, दाजी भाटवडेकर, आत्माराम भेंडे, मा. दिनानाथ, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, चित्तरंजन कोल्हटकर, किर्ती शिलेदार, जयराम शिलेदार, शरद तळवलकर, सवाई गंधर्व, गायिका गंगूबाई हनगल, किशोरी आमोणकर, नूतन गंधर्व, पृथ्वीराज कपूर, गणपतराव बोडस, केशवराव दाते, श्रीराम लागू, निळू फुले, गणपत पाटील यांच्यासारखे दिग्गज मातब्बर मंडळी यांनी आपली कला या नाट्यगृहाच्या मंचावर सादर केली आहे. तसेच हृदयनाथ मंगेशकर, प्रसाद सावकार, सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले यांनी नाट्यगृहात स्वरसाज चढवलाय.

पुढील पिढीने स्वप्निल राजशेखर, सागर तळाशीकर, अभिराम भडकमकर, अविनाश जोशी, दिलीप कुलकर्णी या नाट्य कलावंतांनी आपली कला याचठिकाणी पेश केली. असंख्य कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जादूचे प्रयोग, गाण्याच्या मैफिली, वाद्यवृंद सादरीकरण केले. संगीत नाटके, सामाजिक नाटक आणि प्रायोगिक नाटक, लोककला, लावण्या अशा सर्व प्रकारच्या कलांना इथे रंगमंच उपलब्ध झाला. या सर्वांचा कोल्हापूरकरांना अभिमान आहे. कारण त्याला मोठी परंपरा आहे.

असेच मातब्बर नाट्य कलावंत, नाटककार आणि अभिनेते-अभिनेत्री यांच्या सादरीकरणाने थिएटरमध्ये 'वन्स मोअर'चा आवाज घुमलाय. हेच ऐकण्यासाठी सांडलेल्या राखेतून पुनश्च 'वन्स मोअर'चाच आवाज घुमायला हवा...! हिच अपेक्षा...

- संकलन : स्वालिया शिकलगार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news