

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या एक महिन्याच्या उच्च कारावासाच्या शिक्षेला न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत स्थगिती दिली.
याकामी जेष्ठ विधिज्ञ अॅड. संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. श्रीकृष्ण गणबावले, अॅड. संजना देसाई, अॅड. प्रेरणा सोमाणी, अॅड. अद्वैत वजराटकर यांनी सहकार्य केले.
वकील संग्राम देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जुलै २०१९ मध्ये कणकवली येथील मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या चिखलफेक आंदोलन प्रकरणी तत्कालीन आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
मात्र कलम ५०४ मध्ये सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोषी धरून १ महिन्याचा कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला मंत्री राणे यांच्यावतीने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान देण्यात आले होते.
तसेच अपिलाचा निकाल लागेपर्यंत या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी, असा अर्ज केला होता. सोमवारी या प्रकरणावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. राणे यांच्यावतीने मांडलेली बाजू आणि कायदेशीर तरतुदींचा विचार करून, न्यायमूर्तीनी त्यांना सुनावण्यात आलेल्या कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.