

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड-आंबा मार्गावर असणारा मानोली लघु मध्यम प्रकल्प पुनर्वसू (तरणा पाऊस) नक्षत्राच्या जोरदार पावसाने शनिवारी (दि.६) १०० टक्के भरला. सांडव्यातून १०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मानोली धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे. तालुका प्रशासनाने धरण व धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असून पर्यटकांनी पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत असल्याने इकडे फिरकू नये, असे आवाहन कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी केले आहे.
मानोली लघु मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला
सांडव्यातून १०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू
प्रशासनाने धरण व धबधब्यावर जाण्यास बंदी
मानोली धरण निसर्गरम्य परिसरात असून ५.२० दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. गतवर्षी मानोली प्रकल्प १८ जुलैरोजी ओव्हर फ्लो झाला होता. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने मानोली व कडवी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तालुक्याच्या पश्चिम भागात हे धरण येते. या भागात रोप लावणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. पावसाने जोर धरल्याने भागातील रोप लावणीस वेग आला असून शेतकरी रोप लावणीच्या कामात गुंतले आहेत. निसर्ग सौदर्यांचा अप्रतिम नजारा येथे असल्याने पर्यटकांची या धरणाला अधिक पसंती असते.
कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी इतकी असून आजमितीला ५९.१३ टक्के भरले आहे. धरणाची पाणीपातळी ५९४.३० मी असून उपयुक्त पाणीसाठा ४२.१२ दलघमी इतका आहे. धरण १.४९ टीएमसी भरले आहे. ८० दलघमी पाणीसाठ्यात वाढ झाली असून गत २४ तासांत ७५ मिमी पाऊस बरसला. १ जूनपासून आजअखेर ८४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी कडवी पाणलोट क्षेत्रात ४६३ मिमी पाऊस बरसला होता. गतवर्षी ६ जुलैला ३४ टक्के भरले होते. धरणातून कडवी नदीपात्रात प्रतिसेकंद १५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.