

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा: पावसाळा सुरु होताच पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी सुरु होते. पर्यटन स्थळांवर काही पर्यटकांकडून जीवावर उदार होऊन धाडस केले जाते. त्यामुळे दुर्घटनाही घडतात. ३० जूनरोजी लोणावळा येथे मोठी दुर्घटना घडली. पाच पर्यटकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कोल्हापूर जिल्ह्यातही अशा घटना घडत आहेत. पावसाळी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी प्रशासनाने पर्यटनस्थळी सुरक्षाविषयक उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. केर्ले, मानोली, कांडवण, उखळू, पावनखिंड येथील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकाना बंदी घालण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शाहूवाडीत पावसाळी पर्यटनस्थळांवर तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून हे आदेश लागू करण्यात आलेत. या आदेशान्वये पर्यटकांना धबधबे, नदी, धरण परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. केर्ले, मानोली, कांडवण, उखळू, पावनखिंड या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.
पावनखिंड पर्यटकांना प्रवेश दिला जाईल, येथील बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतिस्थळास भेट देऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करता येईल. मात्र स्मृतिस्थळाच्या शेजारी असणाऱ्या धबधबा पाहण्यास अथवा तिकडे जाण्यास सक्त मनाई करण्यात आली असून केर्ले, मानोली, कांडवण, उखळू, पावनखिंड येथे पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली आहे.
पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने परिसर बहरलेला असतो. पावसाने धबधबे कोसळून ओसंडून वाहतात. धबधब्याचे तुषार अंगावर घेऊन धबधब्याची मजा घेणे हा आनंद काही औरच असतो. पर्यटक बेधुंद होऊन मजा लुटतात आणि न कळत एखादा अपघात घडतो. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. यात कोणाचा मुलगा, मुलगी, पती, वडील, आई, बहीण यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. परिणामी कुटुंब उघड्यावर पडते.