

Kolhapur Shahuwadi heavy rain
विशाळगड : शाहूवाडी तालुक्यात धुवाँधार पाऊस कोसळत असून, कासारी धरण ७४ % तर कडवी धरण ७९ % भरले आहे. पावसाच्या संततधारेने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कासारी धरण क्षेत्रात आजअखेर १५८२ मिमी पाऊस झाला, गेल्या वर्षी याच तारखेला १०९४ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत सरासरी ७४ मिमी पाऊस पडला आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ५७.१८ दलघमी (२.०२ टीएमसी) असून, धरणाची पाणी पातळी ६१८.६० मीटर आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता ७८.५६ दलघमी (२.७७४ टीएमसी) आहे. धरणात १५३९ क्युसेक पाण्याची आवक होत असून, ८०० क्युसेक प्रतिसेकंद पाणी कासारी नदीपात्रात सोडले जात आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरण केवळ ३७ टक्के भरले होते, या तुलनेत यंदा दुप्पट पाणीसाठा आहे.
कडवी धरणही ७९ टक्के भरले असून, सध्या त्यात ५६.२५ दलघमी (१.९९ टीएमसी) पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी ५९७.८१ मीटर आहे. गेल्या २४ तासांत कडवी पाणलोट क्षेत्रात ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजपर्यंतचा एकूण पाऊस १२२३ मिमी झाला आहे. कडवी धरणाची साठवण क्षमता २.५१ टीएमसी आहे. कडवी धरणात ७७३ क्युसेक पाण्याची आवक होत असून, २२० क्युसेक प्रतिसेकंद पाणी सोडले जात आहे.
पावसाचा जोर वाढल्याने कासारी नदीवरील ठाणे, आळवे, यवलुज आणि बाजार भोगाव हे तीन बंधारे पाण्याखाली आहेत. कुंभवडे, केसरकरवाडी, पोबरे, पडसाळी आणि नांदारी हे लघु प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.