

Kolhapur Rain Amba Manoli Dam
विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील मानोली लघु मध्यम प्रकल्प जोरदार पावसामुळे १०० टक्के ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे सांडव्यातून १०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मानोली धबधबाही पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे.
प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने मानोली आणि कडवी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. गतवर्षी हा प्रकल्प ६ जुलैरोजी ओव्हरफ्लो झाला होता. या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.२० दलघमी आहे. दरम्यान, कडवी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे आणि आपल्या तसेच जनावरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मानोली धरण क्षेत्र हे निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, पर्यटकांना या परिसरात येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.