पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरात जीबीएसमुळे (GBS) एका ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यावर बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, जीबी सिंड्रोम आटोक्यात आहे, या रोगातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. 200 रूग्णांपैकी सहा ते सात लोकांचाच मृत्यू झाला आहे. "प्रतिकारशक्ती कमी असल्यास जीबीएस सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच कोल्हापुरातील ही घटना घडली आहे". जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना संदर्भात यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. GBS ला रोखण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. त्यामुळे इथून पुढे अशी कोणतीही घटना होणार नाही, असेही ते म्हणाले.
गर्भलिंग निदान प्रकरणी आरोग्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील मुलींचे प्रमाण कमी होणे, ही चिंताजनक बाब आहे. PCPNDT कायद्याअंतर्गत अधिक कडक कारवाई केली जाणार आहे. गर्भलिंग निदान करणाऱ्यांबाबत सरकार आक्रमक झाले आहे. गर्भलिंग निदान प्रकरणात अनेकवेळा एक आरोपी सापडत असेल तर त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत विचार सुरु असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
मुलींचा मृत्यूदर कमी होणे चिंताजनक असून, शासन आणि समाजाने याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. याबद्दल कारवाई करण्यात शासन कुठेही कमी पडणार नाही, असेही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
शक्तीपीठ महामार्गाबद्दल मतभेद असणे साहाजिक आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये आमच्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. शेतकऱ्यांची ही भावना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पोहोचवलेली आहे. ज्या प्रतिनिधींच्या मतदारसंघातून हा महामार्ग जातो त्यांची आणि शेतकऱ्यांची यामागील भावना महत्त्वाची आहे. म्हणून शक्तीपीठ मार्गावर जनभावना लक्षात घ्यावी लागेल. या बद्दलची वस्तूस्थिती आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू. प्रकल्प व्हावा, मात्र जनसामान्यांची भावनाही समजून घेतली पाहिजे, असेदेखील आरोग्यमंत्री म्हणाले.