

कोल्हापूर: "पराभव हा पराभव असतो, तो पचवण्याची ताकद ठेवावी लागते," अशा शब्दांत मतचोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींवर निशाणा साधतानाच, शरद पवारांनी टाकलेली 'गुगली' ही केवळ कपोकल्पित गोष्ट असल्याचे सांगत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज चौफेर राजकीय हल्ला चढवला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रीय राजकारणापासून ते स्थानिक मुद्द्यांपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करत आमदार सतेज पाटील यांनाही सणसणीत टोला लगावला.
निवडणुकीत मतचोरी झाल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांवर मुश्रीफ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "निवडणूक आयोगाने शपथपत्र देऊन तक्रार करण्यास सांगितले आहे, पण तसे काहीही झालेले नाही. मतदार याद्या वेळेवर प्रसिद्ध होतात, त्यावर आजपर्यंत एकही तक्रार नाही. राहुल गांधी विनाकारण संसद, निवडणूक आयोग आणि देशाचा वेळ वाया घालवत आहेत. आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते हे सर्व करत असावेत."
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन व्यक्ती आपल्याला भेटून गेल्याच्या केलेल्या विधानावर मुश्रीफ यांनी मिश्किल टिप्पणी केली. "शरद पवारांना जर अशा दोन व्यक्ती भेटून गेल्या असत्या, तर त्यांनी त्यांची नावे नक्कीच लिहून ठेवली असती. आता नऊ महिन्यांनंतर पवार साहेबांनी ही गुगली टाकली आहे. या केवळ कपोकल्पित गोष्टी सांगून ते लोकांचे मनोरंजन करत आहेत," असे मुश्रीफ म्हणाले.
मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या विकासाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आणि अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
सर्किट बेंच: "कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होणे हे कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार उघडण्यासारखे आहे. यासाठी अनेकांनी लढा दिला असून, यात दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा मोठा वाटा आहे. ही सहा जिल्ह्यांतील वकील आणि नागरिकांनी लढलेली लढाई आहे."
हद्दवाढ आणि आयुक्तालय: "कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरच होणार आहे आणि ती करावीच लागेल. त्यासोबतच शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय सुद्धा उभारणार आहोत," असे आश्वासन त्यांनी दिले.
शक्तीपीठ महामार्ग: "शक्तीपीठ महामार्ग व्हावा ही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, पण तो कुणावरही लादला जाणार नाही. जिथे शेतकरी समाधानी नसतील, तिथे हा रस्ता होऊ द्यायचा नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे," असे मुश्रीफ यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील यांनी महामार्गाच्या खर्चावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना मुश्रीफ यांनी टोला लगावला. ते म्हणाले, "आमदार सतेज पाटील नवीन आर्किटेक्ट झाले आहेत, हे मला माहिती नव्हतं. त्यांचे ज्ञान प्रगल्भ झाले आहे. रस्त्याची लांबी किती आहे, यावर खर्च ठरत असतो. महामार्गासाठी खर्च वाढला आहे, हा त्यांचा गोड गैरसमज आहे."
आगामी निवडणुकांबद्दल बोलताना मुश्रीफ यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. "राष्ट्रवादी पक्ष हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उभारी घेईल. आमची कासवाप्रमाणे चाल सुरू आहे, पण आम्ही निश्चित यशस्वी होऊ. कोल्हापुरात युतीचाच महापौर होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले की, आरोप सिद्ध झाल्याशिवाय कारवाई होऊ शकत नाही आणि विरोधी पक्षाचे काम वातावरण ढवळून ठेवणे आहे.