

कोल्हापूर : प्रतिवर्षी नागपंचमी दिवशी गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडण्याच्या सरावास प्रारंभ होत असतो. यामुळे गोविंदा पथकांना केवळ दहीहंडी दिवशी विमा संरक्षण न देता सरावाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटची दहीहंडी फुटेपर्यंत विमा सुरक्षा कवच मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सराव करतानाही गोविंदांना होणार्या दुखापतींचे प्रकार, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींकडून सोयीच्या दहीहंडी स्पर्धांचे आयोजन यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. यंदा दहीहंडीचा थरार शनिवार (दि. 16) रोजी रंगणार आहे. दहीहंडी उत्सवाला अवघे काही दिवस उरल्याने गोविंदा पथकांचा कसून सराव सुरू आहे.
दीड लाख गोविंदांना विमा कवच
राज्य शासनाने गतवर्षी सव्वालाख गोविंदांना विमा कवच दिले होते. यंदा ही संख्या वाढल्याने दीड लाख गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्यात आले आहे. किरकोळ दुखापतीसाठी 1 लाख रुपये, मोठ्या दुखापतीस 5 लाख रुपये आणि दुर्दैवाने एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांना 10 लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. विम्याची मुदत दि. 17 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागासाठी प्रयत्न
महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन मुंबई यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये असोसिएशनची स्थापना करण्याचे काम सुरू आहे. 14 वर्षांवरील शालेय क्रीडा प्रकारात समाविष्ट करण्याचे प्रयत्न शासन पातळीवर सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष बाळा पडेलकर, सुरेंद्र पाटील, गीता झगडे, डेव्हिड फर्नांडिस सक्रिय आहेत.
साहसी खेळाचा दर्जा अन् प्रो गोविंदा लीग
उंच दहीहंड्यांमध्ये सहभागी होणार्या गोविंदांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या तसेच अपंगत्वाच्या घटनांमुळे न्यायालयाने 18 वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीत सहभागी होण्यास बंदी घातली होती. यामुळे राज्य सरकारने गोविंदांना विमा संरक्षण देत दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळवून दिला (11 फेब्रुवारी 2015). इतकेच नव्हे तर प्रो-गोविंदा लीग ही स्पर्धा सुरू केली. यंदाच्या हंगामाचे एकूण बक्षीस दीड कोटी रुपये इतके होते. पुढील वर्षीपासून विविध जिल्ह्यांत प्रो-गोविंदा लीगचे आयोजन केले जाईल.
लाखमोलाच्या दहीहंडी
दहीहंडीसाठी होणार्या गर्दीवर नजर ठेवून राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींकडून लाखमोलाच्या दहीहंडी स्पर्धांचे आयोजन केले जाते. पक्ष-संघटनांच्या वतीने मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, कोकणासह अनेक जिल्ह्यांत लाखमोलाच्या दहीहंडी आयोजित केल्या जातात.