व्वाव! कोल्हापुरातून होते केसांची निर्यात; कमाई १० काेटींची, युराेपिय देश अन् अमेरिकेतून मागणी

व्वाव! कोल्हापुरातून होते केसांची निर्यात; कमाई १० काेटींची, युराेपिय देश अन् अमेरिकेतून मागणी

कोल्हापूर : कोल्हापुरातून साखर, गूळ, फळे, भाजीपाला, औद्योगिक कास्टिंग उत्पादने, कोल्हापुरी चप्पल आदींची निर्यात होते, हे सर्वांनाच माहिती आहे; पण कोल्हापुरातील केसांचीही निर्यात होते, हे तुम्हाला माहीत नसेल? होय तुम्ही वाचताय ते अगदी खरे आहे, कोल्हापुरातून जमा झालेल्या काळ्याभोर केसांना विदेशात मोठी मागणी असून, त्यांची वर्षाकाठी उलाढाल 10 कोटींची आहे.

'केस घेणार… केस, 500 रुपये पावशेर केस!' अशी साद घालणारा मोटारसायकलवरील फेरीवाला तुम्ही अनेकदा पाहिला असेल; पण कधी तुम्ही विचार केलाय का? हे विक्रेते हे केस विकत घेऊन कुठे घेऊन जातात. टाकाऊ समजल्या जाणार्‍या केसांचा कोट्यवधी रुपयांचा व्यापारच नाही, तर त्याची मोठी निर्यातही होते.

केस विंचरताना कंगव्याबरोबर येणारे केस, एवढा भाव खातील, याची कल्पनाही पूर्वी कुणी केली नसेल; पण आता 10 ग्रॅम केसांना 20 रुपये मिळतात. म्हणूनच गृहिणी कंगव्यात येणारे केस जमा करून जपून ठेवतात. वस्ती वस्तीत जाऊन फेरीवाले ते 500 रुपये पाव किलो दराने खरेदी करतात. पुढे हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते परदेशात पोहोचतात.

कोल्हापूर शहरात केसांचे दोन मोठे खरेदीदार आहेत. ते फेरीवाल्यांनी जमा केलेले केस सध्या 3,000 रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतात. फेरीवाल्यांना किलोमागे 1,000 रुपये मिळतात. खरेदीदार हे केस रेल्वेने कोलकाता किंवा अन्य शहरांतील निर्यातदारांकडे पाठवितात. तिथे केसांवर प्रक्रिया होऊन ते परदेशात जातात. भारतातील केस, विशेषतः कोणत्याही रसायनांचा वापर न केलेल्या नैसर्गिक केसांना आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे. दक्षिण भारतात केसांची गुणवत्ता चांगली असते.

कोल्हापुरातील केसांचा व्यापार

रोहन कुचकोरवी हे कोल्हापुरातील केसांचे मोठे व्यापारी आहेत, त्यांनी सांगितले की, दर महिन्याला दोन प्रमुख विक्रेत्यांकडे मिळून पाच क्विंटल केस जमा होतात. त्यांची स्थानिक बाजारातील किंमत एक ते सव्वा कोटी रुपयांच्या आसपास असते.

केसांचे दर ठरतात कसे?

गुणवत्ता : लांब, जाड आणि नैसर्गिकरीत्या काळ्या किंवा तपकिरी केसांना सर्वाधिक दर मिळतो, 30 सें.मी. लांबीच्या केसांना प्रतिकिलो 70 हजार रुपयांपर्यंत दर मिळतो.

केसांचा स्रोत : फेरीवाल्यांनी जमा केलेले केस सर्वात स्वस्त असतात, सलूनमधून किंवा मंदिरातील दानांमधून मिळवलेले केस अधिक महाग असतात.

प्रक्रिया : विग आणि हेअर एक्स्टेंशनसाठी वापरण्यासाठी केसांवर प्रक्रिया केल्यानंतर केसांमध्ये मोठी व्हॅल्यू अ‍ॅडिशन होते. ही उत्पादने महाग असतात, त्यामुळे केसांना महत्त्व आले आहे.

भारतात केसांच्या सरासरी किमती

फेरीवाल्यांनी गोळा केलेले केस : 2,000 ते 4,000 रुपये प्रतिकिलो.
पार्लर्समधून जमा केलेले (फक्त महिलांचे लांब केस) : 4,000 ते 8,000 रुपये प्रतिकिलो.
मंदिरातील दानांमधून मिळवलेले केस : 8,000 ते 20,000 रुपये प्रतिकिलो.

आंतरराष्ट्रीय उलाढाल 25 हजार कोटींची

2023 च्या अंदाजानुसार, जागतिक केस बाजारपेठेचे मूल्य 2,886.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर (साधारणत: 25 हजार कोटी रुपये) होते. भारत जगभरातील अनेक देशांमध्ये केस निर्यात करतो. 2022-23 मध्ये भारताने 3 हजार कोटी रुपये मूल्याचे केस निर्यात केले. अमेरिका, सर्व युरोपियन देश आणि चीन, थायलंड, सिंगापूर हे भारतीय केसांचे प्रमुख आयातदार देश आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news