Ganja Racket Case | सराईत गुंडाच्या आई, मैत्रिणीची गांजा रॅकेटला रसद

ऑनलाईन व्यवहारातून निष्पन्‍न; दोघींना अटक
Ganja Racket Case | सराईत गुंडाच्या आई, मैत्रिणीची गांजा रॅकेटला रसद
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘मोका’अंतगर्त कारवाई केलेल्या साई-भाई गँगचा म्होरक्या सराईत गुंड गेंड्या ऊर्फ ऋषीकेश चौगुले याच्या आई व मैत्रिणीने गांजा विक्रेत्यास आर्थिक रसद पुरवल्याचे तपासात निष्पन्‍न झाले. यानुसार राजारामपुरी पोलिसांनी स्नेहल संजय चौगले (वय २७, रा. राजारामपुरी, चौदावी गल्ली), सुनीता बाबासो चौगुले (५१, रा. वर्षानगर) यांना अटक केली. झालेल्या नफ्यातून या दोघींना दररोज हिस्सा पोहोचत असल्याचेही तपासात समोर आले.

अनिकेत संतोष चौगुले (२० रा. काटकर कॉलनी, राजारामपुरी) याला राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २१) अटक करून २ किलो ५०० ग्रॅम गांजासह मोबाईल, वजन काटा असा १ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्याने सोलापूर येथून गांजा खरेदी केल्याचे समोर आले होते. अनिकेतच्या ऑनलाईन व्यवहारांची माहिती घेतली असता, त्याला स्नेहल चौगले, सुनीता चौगुले या आर्थिक पुरवठा करत असल्याचे समोर आले. यानुसार पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह पथकाने या दोघींवर अटकेची कारवाई केली. गांजासह अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिला.

ऑनलाईन व्यवहारांची पडताळणी

अनिकेत, स्नेहल आणि सुनीता यांच्यामधील ऑनलाईन व्यवहारांची पडताळणी पोलिसांनी केली आहे. एक महिन्यापूर्वी स्नेहलने २० हजार, तर सुनीताने ४० हजार अनिकेतला पाठवल्याचे समोर आले आहे. यापूर्वीचे व्यवहारही पडताळण्याचे काम सुरू आहे.

नफ्यात तीन वाटण्या

गांजा तस्करी आणि विक्रीतून मिळणाऱ्या फायद्याच्या तीन वाटण्या केल्या जात होत्या. दररोज अनिकेत फायद्यातील रक्कम स्नेहल आणी सुनीताला पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या वर्षभरापासून हा व्यवहार सुरू असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news