बोलताना मर्यादा सांभाळा; अन्यथा आम्हीही बंधनातून मुक्त होऊ : दीपक केसरकर

दीपक केसरकर
दीपक केसरकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बोलताना मर्यादा सांभाळा, अन्यथा आम्हीही बंधनातून मुक्त होऊ, असा इशारा शिक्षणमंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री व शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सोमवारी ठाकरे कुटुंबीयांना दिला. संजय राऊत यांच्यासारखे बेजबाबदार किती बोलायचे याचा आदित्य ठाकरे उत्तम नमुना आहे, अशी टीकाही त्यांनी केली. संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना मंगळवारी मुंबईतच उत्तर देऊ, असेही त्यांनी सांगितले.

केसरकर म्हणाले, मतभेद झाले म्हणून आम्ही उठाव केला. आमच्या आमदार-खासदारांची बैठक झाली, मतभेद झाले तरी ठाकरे कुटुंबांविषयी अद्याप आदर आहे. यामुळे ठाकरे कुटुंबीयावर वैयक्तिक पातळीवर कोणीही टीका करायची नाही, असे बंधन आम्ही घालून घेतले होते. मात्र, त्यांनी जर मर्यादा पाळल्या नाहीत तर आम्हीही बंधनातून मुक्त होऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

आमच्याविरोधात ज्या पद्धतीने बेलगाम, बेजबाबदारपणे आणि अपमानास्पद बोलले जात आहे, त्याला आता सडेतोड उत्तर द्यावेच लागेल, असे स्पष्ट करत केसरकर म्हणाले, वारंवार खोटे बोलले की सत्य वाटायला लागते. आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊत यांचीच पद्धत अवलंबली आहे. खोटे कसे बोलायचे हे शिकवणारी वेगळीच माणसे त्यामागे आहेत. मात्र, महाराष्ट्रात वैचारिक मतभेद, संघर्षाची वेगळी परंपरा आहे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे; अन्यथा कुणीही चांगला माणूस समाजकारण, राजकारणात येणार नाही.

राजर्षी शाहू महाराजांचे चिरंतन स्मारक ठरेल, त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होईल, अशा स्वरूपाचे शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होईल. त्याचा आराखडा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या निमित्त माणगाव येथे होलिग्राफिक सेंटर, वातानुकूलित हॉल आदी विविध विकासकामे सुरू आहेत. शाहू जन्मस्थळातही होलिग्राफिक सेंटरसाठी निधी दिला जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news