सीपीआरचा 38 कोटींचा प्रस्ताव लवकरच मंजूर करू :  पालकमंत्री केसरकर

सीपीआरचा 38 कोटींचा प्रस्ताव लवकरच मंजूर करू :  पालकमंत्री केसरकर
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, सांगलीसह कोकणातल्या माणसांवरही उपचार करणार्‍या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाने विविध सोयी, सुविधांसाठी दिलेल्या 38 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी दिली जाईल. पुढच्या कार्यक्रमाला येताना हा मंजुरीचा आदेश घेऊनच आम्ही येऊ, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी येथे दिले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मॉड्युलर ओटी व बालरोग अतिदक्षात विभागाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

केसरकर म्हणाले, या सरकारी दवाखान्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी कोरोना काळात लोकांची चांगल्याप्रकारे काळजी घेतली आहे. या रुग्णालयात अधिकाधिक सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. नुकताच शेंडापार्क येथील जागेचा प्रश्न मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला होता. प्रशासकीय इमारत, आयटी पार्क, वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वतंत्र रुग्णालय हे सर्व विषय लवकरच मार्गी लावले जातील. तसेच 38 कोटी रुपयांच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात येईल. शहरातील रस्त्यांसाठी 71 कोटी दिले आहेत. लवकरच कामांना सुरुवात होईल.

सीपीआर हे राज्यातील एक नंबरचे रुग्णालय बनवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, या रुग्णालयात अधिकाधिक सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी मी 2009 ला आमदार झाल्यापासून माझे प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयाशी माझे वेगळे नाते आहे. त्यामुळे येथे सर्वतोपरी मदत करून हे सुसज्ज रुग्णालय उभा करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे, सर्जरी विभागप्रमुख डॉ. वसंतराव देशमुख, डॉ. अजित लोकरे, डॉ. राहुल बडे, डॉ. कुरूंदवाडे, डॉ. थोरात, डॉ. सुधीर सरवदे, अंजिली देवरकर, मूरगडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार उपस्थित होते. डॉ. प्रिया होबाळकर यांनी सूत्रसंचालन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news