

आजरा : आजरा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला असून तालुक्यातील ४५ हेक्टरवरील भूईमूगावर संक्रांत कोसळली आहे. बहुतेक गावातील भूईमूग कुजल्याने कधी नव्हे ते मे महिन्यातच शेतक-यांवर संकट आले आहे. तर मुसळधार पावसामुळे पेरणीचा हंगाम लांबणीवर पडणार आहे.
तालुक्यात खरिपाची पेरणी, टोकण व भात रोप लावण केली जाते. साळगाव, सोहळे, कोवाडे, सरोळी, खेडे, गजरगाव या पट्टयात उन्हाळी भुईमूग घेतला जातो. उन्हाळी भुईमुगाचे पीक पावसामुळे वाया गेले आहे. शेतजमिनीमध्येच भुईमुगाच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ७ लाखांपर्यंत नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
शिवारात सध्या भुईमुगाची काढणी चिखल व पाण्यातूनच सुरू आहे. तालुक्यात भात, भुईमूग, सोयाबीन, मिरची व नाचणी ही प्रमुख पिके घेतली जातात. चित्री, सर्फनाला, उचंगी, आंबेओहळ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाल्याने शेतकरी उन्हाळी पिके घेत आहेत.
तालुक्यात आजरा, सोहाळे, हाजगोळी, हाजगोळी बुद्रक, भादवण, कोवाडे, पेरणोली, कोरीवडे, हरपवडे, मडिलगे, दाभिल, वेळवट्टी, सोहाळे यासह नदीकाठावरील विविध गावात शेतक-यांनी उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले आहे. काही शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन पंधरा दिवसांपूर्वी पिकाची काढणी केली. पण ज्यांनी काढणी केली नाही, त्यांना फटका बसला आहे. पावसामुळे वावरात पाणी साचल्यामुळे भुईमूग कुजला आहे.
१६ वर्षांपूर्वी मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला होता. त्यावेळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सांगितले.
बहुतांश शेतक-यांनी उसाची भांगलण, खत टाकणी केलेली नाही. त्यात मुसळधार पावसामुळे उसात पाणी तुंबले आहे. भूईमूगापाठोपाठ उसाचेही मोठे नुकसान झाले आहे.