कोल्हापूर: शाहूवाडीत जुनी पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

कोल्हापूर: शाहूवाडीत जुनी पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : 'एकच पेन्शन, जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, 'जो पेन्शन पर बात करेगा, वही देशपर राज करेंगा…अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती शाहूवाडी व तहसील कार्यालय शाहूवाडी असा विराट मोर्चा काढला. यावेळी जुनी पेन्शनला विरोध करणाऱ्यांना घरी बसवू, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.

जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी या राज्यव्यापी संपात सहभाग घेतला आहे. सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. याबाबत विविध संघटनांनी आजपर्यंत मोर्चा, निवेदन, विविध प्रकारचे आंदोलन केली आहेत. मात्र, यावर राज्य सरकारकडून कुठलाही सकारात्मक निर्णय घेतला नाही. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत अन्यासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा आदी मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी आज (दि.१४) मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दि १४ रोजी पंचायत समिती शाहूवाडी येथे सकाळी दहा ते साडेबारा दरम्यान प्राथमिक, माध्यमिक शाळा, महसूल व वन विभाग कर्मचाऱ्यांनी येथे जाहीर सभा घेऊन गटविकास अधिकारी रामदास बघे यांना प्रथम निवेदन दिले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवू असे आश्वासन दिले. त्यानंतर पंचायत समिती ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महसूल व वनविभाग कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अमित माळी यांना विविध संघटनांनी निवेदन दिली.

मोर्चात 'एकच पेन्शन, जुनी पेन्शन' लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घालून भर उन्हात कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कोजीमाशी संचालक प्रकाश कोकाटे म्हणाले, जे कर्मचारी राज्य घडविण्याचे काम करतात. त्यांच्यावरच सरकार अन्याय करत आहे. संजय पाटील म्हणाले, जोपर्यंत पेन्शन मिळत नाही, तोपर्यंत लढा थांबणार नाही, जे नेते आपल्या लढ्यात सोबत असतील, भविष्यात त्यांच्याच पाठीशी आपण ठाम राहू, जालिंदर कांबळे म्हणाले, कोल्हापुरातून पदवीधर मतदारसंघातून आमदार झाले आणि आता मोठे मंत्री झाले. त्यांनी तरी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहावे, त्यांना कोल्हापूरकर कधीच माफ करणार नाहीत.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, एन. बी. पाटील, जनार्धन गुरव, कनिष्ठ महाविद्यालय प्रतिनिधी एच. बी. जवळेकर, ग्रामसेवक संघटना प्रतिनिधी अमर पाटील, वन संघटना प्रतिनिधी जालिंदर कांबळे, ग्रामसेवक प्रतिनिधी सुभाष पाटील, प्राथमिक शाळा प्रतिनिधी सदाशिव कांबळे, प्राथमिक शिक्षक संघटना उपाध्यक्ष श्रीमती जाधव, शिक्षक भारती अध्यक्ष मोहन कोलते, टीडीएस संघटनेचे जनार्धन गुरव आदींनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी संपात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती, प्राथमिक पुरोगामी संघटना, आरोग्यसेवक संघटना, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महसूल, वनविभाग आदी संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी राजेंद्र सुर्यवंशी, एन. बी. पाटील, शिवाजी-रोडे पाटील, सदाशिव कांबळे, जालिंदर कांबळे, एच बी जवळेकर, अमर पाटील, मनीषा कोरडे, मोहन कोलते, क्षमा जाधव आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी हजारो कर्मचारी संपात सहभागी झाले होते.

'एकच मिशन जुनी पेन्शन'

शासकिय कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्याला पहिल्याच दिवशी शाहूवाडीत चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयांच्या समोर उभे राहून घोषणाबाजी केली. 'एकच मिशन जुनी पेन्शन' अशा घोषणानी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान आपल्या विविध कामासाठी तालुक्यातून नागरिक या कार्यालयात आले होते. मात्र संपामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. हा संप नक्की किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार नाही, असा आंदोलकांचा पवित्रा दिसत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news