

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २० मार्चपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होईल. २० ते २७ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. तर २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी संचालकांची संख्या दोन ने वाढून २१ झाली आहे.
मागील निवडणूक होऊन आठ वर्ष झालेल्या आणि माजी आमदार अमल महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्याकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जुन्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ७ तालुक्यातील १२२ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याचे एकूण १३५३८ सभासद आहेत. १३४०९ ऊस उत्पादक सभासद तर १२९ ब वर्ग सभासद निवडणुकीला मतदानासाठी पात्र ठरले आहेत. सर्वाधिक सभासद करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील आहेत.
२० ते २७ मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. दाखल अर्जांची छाननी २८ मार्चरोजी होणार आहे. वैध उमेदवारांची यादी २९ मार्चरोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ एप्रिल असून १३ एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २३ एप्रिलरोजी मतदान होईल, तर २५ एप्रिलरोजी मतमोजणीला होणार आहे.
हेही वाचा