

कोल्हापूर: ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, तसेच अमोल काळे आणि शरद कळसकर यांना मंगळवारी (१४ ऑक्टोबर २०२५) कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) सर्किट बेंचने जामीन (Bail) मंजूर केला. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या पीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील तीन संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांच्या जामीन अर्जावर कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर हायकोर्टाने तिघा आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.
पानसरे हत्या प्रकरणात एकूण 12 संशयित आरोपी होते. यातील 9 आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता. तर मंगळवारच्या सुनावणीनंतर उर्वरित तीन आरोपींचाही कारागृहातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वच्या सर्व आरोपींना जामीन मिळाल्याने पोलिसांच्या तपासावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
कॉ. गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि महाराष्ट्र पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) या दोन्ही तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, आता प्रमुख संशयितांना जामीन मिळाल्याने या प्रकरणाची पुढील दिशा काय असेल, याकडे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पानसरे हत्याप्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं?
1. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना वर्ष २०१८ मध्ये कोल्हापूर येथील न्यायालयाने जामीन संमत केला होता. जामीन संमत झाला, तरी ते डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात जामीन न मिळाल्याने पुणे येथील कारागृहात होते.
2. डॉ. तावडे यांची डॉ. दाभोलकर प्रकरणात १० मे २०२४ या दिवशी निर्दोष मुक्तता झाल्यावर ते कारागृहाबाहेर आले होते.
3. यानंतर डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन कोल्हापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांनी १६ जुलै २०२४ या दिवशी रहित केला होता.
4. अखेर १४ ऑक्टोबर २०२५ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचकडून जामीन संमत.
5.या प्रकरणात एकूण १२ संशयित असून मुंबई उच्च न्यायालयाकडून कॉ. पानसरे हत्या प्रकरणी संशयित सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भरत कुरणे, अमित बद्दी आणि वासुदेव सूर्यवंशी यांना या अगोदरच जामीन संमत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड यांनाही या अगोदरच जामीन मिळालेला आहे.