शासकीय रुग्णालये होणार ‘स्वच्छ आणि सुंदर’

शासकीय रुग्णालये होणार ‘स्वच्छ आणि सुंदर’

कोल्हापूर : अनिल देशमुख वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी शासकीय रुग्णालये आता 'स्वच्छ आणि सुंदर' राहणार आहेत. याकरीता स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याकरीता प्रत्येकांची जबाबादारी निश्‍चित करून कालबद्ध कार्यक्रमही निश्‍चित करण्यात आला आहे.

शासकीय रुग्णालयात गेल्या काही वर्षांत आगीच्या घटना घडल्या आहेत. रुग्णालयात दाखल असणारे रुग्ण, अधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेसाठी अग्‍निसुरक्षा व विद्युत सुरक्षांबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे. याचा प्राथमिक टप्पा म्हणून ही रुग्णालये अधिक स्वच्छ आणि सुंदर केली जाणार आहेत.

शासकीय रुग्णालये म्हणजे ठिकठिकाणी, अस्तावस्त पडलेले प्लास्टिकचे तुकडे, थर्मोकोल, पुठ्ठे, रद्दी, नादुरुस्त, वापरात नसलेले भंगारमधील फर्निचर आदी साहित्य, रंग उडालेल्या भिंती, तुटलेले दरवाजे, अस्वच्छ स्वच्छतागृहे असेच चित्र अनेक ठिकाणी दिसते. मात्र, हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी 'स्वच्छता अभियान' राबविण्यात येणार असून याकरीता 700 गुणांची स्पर्धाही घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या पाच रुग्णालयांचा सन्मान केला जाणार आहे.

रुग्णालयांना हे करावे लागणार
उपलब्ध मनुष्यबळाकडून रुग्णालयांची स्वच्छता, कचर्‍यांची वर्गवारी करून त्याची विल्हेवाट, रुग्णालयाचा विविध रंगसंगती व चिन्हांसह नकाशा प्रवेशद्वारासमोर लावणे, मराठी व इंग्रजी भाषेतील दिशादर्शक फलक लावणे, रुग्णांचे हक्‍क व त्यांच्या जबाबदार्‍या, उपचारांसाठी येणारा खर्च, संबंधित डॉक्टर, अधिकारी, कर्मचार्‍यांचे संपर्क क्रमांक, रक्‍तपेढीचा तपशील, रुग्णवाहिकेचा तपशील, उपचार सुविधांची माहिती, विभागांच्या कामाच्या वेळा, विभाग प्रमुखांची नावे, संपर्क क्रमांक, विविध कायद्यांची माहिती देणारे फलक प्रमुख भागात लावणे, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी बसण्यासाठी, पिण्याची पाणी, भोजन, वाहनतळासाठी योग्य ती व्यवस्था करणे, परिसरातील, रुग्णालयातील सर्व मार्गावरील सर्व साहित्य हटवून ते मार्ग मोकळे व स्वच्छ ठेवणे, लिफ्टकडे जाणार्‍या मार्गातील साहित्य हटवणे, लिफ्टची नियमित स्वच्छता, देखभाल, दुरुस्ती, सर्व विभागासमोरील सर्व अनावश्यक साहित्य हटवणे, स्वच्छतागृहाची देखभाल, दुरुस्ती, मुबलक पाणी पुरवठ्याची नियमित खात्री करणे, मल:निसारण व्यवस्थेची देखभाल दुरुस्ती करणे, सर्व फर्निचर, दरवाजे, खिडक्या व झडपा यांची नियमित स्वच्छता, नादुरुस्त विद्युत उपकरणांची दुरुस्ती, सुट्या, लोंबकळणार्‍या तारा दुरुस्त करणे अथवा काढून टाकणे, सर्व जिने मोकळे आणि स्वच्छ ठेवणे, गळतीची उपाय योजना, त्यासह इमारतीच्या आतील व बाहेरील रंग, फरश्या, प्लास्टर आदींची नियमित देखभाल, दुरुस्ती आदी 17 प्रकारची कामे करावे लागणार आहेत.

नव्या ठेवींचे प्रमाण 47.1 टक्क्यांनी घटले

या निर्णयांची राज्यातील सर्वच रुग्णालयांनी प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. ती झाली तर राज्यातील या शासकीय रुग्णालयांचे दोन महिन्यांतच वेगळे चित्र दिसेल. शासकीय रुग्णालये रुग्णांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच प्रसन्‍न राहतील.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news