

पुढारी ऑनलाईन डेस्क: Sambhaji Chhatrapati | माजी खासदार व स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात शासनाकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी आज (दि.६) त्यांच्या अधिकृत एक्स (X) अकाऊंटवरून केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हल्ली कुणीही उठून आपापल्या आकलनानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनाला वाटेल तसा सांगत आहे. इतिहासाची प्रतारणा होईल, लोकभावनेस ठेच लागेल, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, याचे कुणालाही भान राहिलेले नाही. यावर ठोस उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा", अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पुढे त्यांनी "शासनाने शिवचरित्राचे संशोधक, अभ्यासक व चिकित्सक यांची संशोधन समिती स्थापन करून भक्कम संदर्भांवर आधारित शासकीय चरित्रग्रंथ प्रकाशित करावा, जेणेकरून शिवचरित्रावरील व्याख्याने, मालिका, नाटक, चित्रपट आदी सर्व साहित्यांस हा शासकीय चरित्रग्रंथ संदर्भ म्हणून वापरता येईल आणि इतिहासाविषयी वादंग उठणार नाही. याविषयी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी. मी या चरित्र ग्रंथाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे, असे आश्वासनदेखील त्यांनी शासनाला एक्स (X) पोस्टवरून दिले आहे.