

Gokul Election Nomination Forms
आशिष पाटील
गुडाळ : गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मंगळवारी (दि.१५) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल ४७० उमेदवारी अर्जांची विक्रमी विक्री झाल्याने निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची मोठी मांदियाळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, मावळते चेअरमन नावेद मुश्रीफ तसेच मावळते संचालक शशिकांत पाटील-चुयेकर आणि वसंत ऊर्फ बाळासाहेब खाडे यांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
मात्र, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय आणि महिला गटात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
महायुतीतील भाजप वगळता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाच्या इच्छुकांकडून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी मुंबईत जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाल्यास भाजपचे इच्छुक उमेदवारही गुरुवारीच एकत्रितपणे अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. अन्यथा भाजपकडून २१ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडीच्या वतीनेही गुरुवारी (दि. १७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
एकाच दिवशी विविध राजकीय पक्ष आणि आघाड्यांच्या इच्छुकांकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणार असल्याने १७ सप्टेंबरला निवडणूक कार्यालयात प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी ४७० अर्जांची झालेली विक्रमी विक्री आणि गुरुवारी होणारी संभाव्य गर्दी यामुळे गोकुळ निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.