Gokul Election Result : गोकुळमध्ये सतेज पाटील यांच्या नेतृत्‍वाखाली समविचारी आघाडीची विजयी पताका!

समविचारी आघाडीला १३ जागा तर महायुतीला १२ जागांवर यश, मुश्रीफ, पाटील, डोंगळे, महाडिक, मिणचेकर या दिग्गजांना पराभवाचा धक्का
Gokul Election Result
Gokul Election Result
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या रणांगणात आ. सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने सोमवारी विजयाचे सीमोल्लंघन केले. चुरशीने झालेल्या लढतीत समविचारीने १३ जागा जिंकत सत्ता मिळविली, तर महायुतीचा रथ १२ जागांवर थांबला. माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुणकुमार डोंगळे, शौमिका महाडिक, माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. विजयानंतर आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी रमणमळा व अजिंक्यतारा कार्यालय येथे एकच जल्लोष केला.

गोकुळसाठी रविवारी ९९.९६ टक्के मतदान झाले होते. सोमवारी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी आठ वाजता ३५ टेबलांवर केंद्रनिहाय मतमोजणीला सुरुवात झाली. सीलबंद केलेल्या मतपेट्या बाहेर काढल्यानंतर पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात सर्वसाधारण गटात महायुतीचे १७ तर समविचारीचे शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे हे तीन उमेदवार आघाडीवर होते. मात्र दुसऱ्या फेरीनंतर समविचारी आघाडीने मताधिक्य घेण्यास सुरुवात केली. तीनवरून त्यांचे सहा उमेदवार आघाडीवर गेले. अखेर सर्वसाधारण गटातून त्यांचे आठ उमेदवार विजयी झाले.

राखीव गटात समविचारी आघाडीचे वर्चस्व

राखीव गटातील पाच जागांवर समविचारीचे उमेदवार विजयी झाले. महिला राखीव गटातून शौमिका महाडिक यांना पराभवाचा धक्का बसला; तर अंजना रेडेकर व भाग्यश्री डोंगळे यांनी विजय मिळविला. अनुसूचित जाती प्रवर्गातून माजी आ. राजू आवळे, भटक्या विमुक्त प्रवर्गातून बयाजी शेळके आणि इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) नवीद मुश्रीफ यांचा धक्कादायक पराभव करत शशिकांत खोत विजयी झाले.

विश्वास पाटील यांचा फेरमतमोजणीचा अर्ज फेटाळला

मतमोजणी झाल्यानंतर माजी संचालक विश्वास पाटील व युवराज पाटील यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी त्यांचा फेरमतमोजणीचा अर्ज फेटाळला.

सर्वसाधारण गट विजयी उमेदवार समविचारी आघाडी

शशिकांत पाटील-चुयेकर, अभिजीत तायशेटे, विद्याधर गुरबे, किसन चौगले, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, राहुल देसाई, बाबासाहेब चौगले,

सर्वसाधारण गट विजयी उमेदवार महायुती

डॉ. चेतन नरके, वीरेंद्र मंडलिक, राहुल पाटील, अंबरीश घाटगे, अजित नरके, राजेश पाटील, रणजीतसिंह पाटील, अजित पाटील, रणजित दि. पाटील, मदन देसाई, अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news