

कोल्हापूर : 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीकडे चार हजार चारशे ठराव असल्याचा दावा नेतेमंडळी करत होती. मग मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाविरुद्ध षड्यंत्र कोणी रचले? मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांनुसार संशयाची सुई महायुतीतील नेत्यांकडेच फिरत आहे. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करून आगामी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यायची हे ठरवावे, असा टोला काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला.
नवीद मुश्रीफ यांच्या पराभवावर भाष्य करताना मंत्री मुश्रीफ यांनी त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आ. पाटील बोलत होते. आ. पाटील म्हणाले, निवडणुकीपूर्वी महायुतीतील नेते आपल्याकडे चार हजार चारशे ठराव असल्याचे सांगत होते. असे असताना नवीद मुश्रीफ यांच्याविरुद्ध षड्यंत्र कोणी रचले, याचा शोध त्यांनी स्वतः घ्यावा. आता तालुकानिहाय मतदानाची आकडेवारीही समोर आली आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांचा विचार करता, संशयाची सुई महायुतीतील नेत्यांकडेच जाते. समविचारी आघाडीचा नेता म्हणून आपल्या पॅनेलमधील सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली भूमिका होती. मात्र, महायुतीमध्ये नेमके कोणी कोणाविरुद्ध षड्यंत्र रचले, याचे आत्मपरीक्षण मुश्रीफ यांनी करावे.
दरम्यान, गोकुळ निवडणुकीतील इतर मागास प्रवर्गाच्या जागेवरूनही सतेज पाटील यांनी महायुतीतील राजकीय गणितांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या गटातील समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत खोत यांना पन्हाळा तालुक्यातून तब्बल २०१ मताधिक्य मिळाले. विशेष म्हणजे, या तालुक्यात समविचारी आघाडीकडे केवळ ३५ ठराव असल्याचा दावा पाटील यांनी केला. ठरावांची संख्या आणि प्रत्यक्ष मिळालेली मते यातील फरकाकडे लक्ष वेधत पाटील यांनी नवीद मुश्रीफ यांच्या पराभवामागे आमदार विनय कोरे यांची भूमिका असल्याचा आरोप केला. जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी कोरे यांनीच नवीद मुश्रीफ यांना पराभूत केल्याचा दावा त्यांनी केला.