

Mousami Chougule Returning Officer Appointment
आशिष पाटील
गुडाळ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ तथा गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदी करवीरच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती मौसमी चौगले यांची नियुक्ती महाराष्ट्र सहकार प्राधिकरणाने आज केली. महाराष्ट्र सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोकराव गाडे यांनी चौगले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
गोकुळची अंतिम मतदार यादी 4 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गोकुळच्या निवडणुकीला कालमर्यादा आखून दिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊन त्यांच्याकडून रीतसर निवडणूक कार्यक्रम तयार करून प्राधिकरणाकडून तो मंजूर घेण्याचे काम तातडीने करावे लागणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती काही दिवस प्रतीक्षेत होती.
गोकुळच्या मतदार यादी कार्यक्रमात झालेला कमालीचा राजकीय हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांवर आलेला दबाव , त्यातूनच अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या यामुळे 'गोकुळ' साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करण्यास महसूल आणि सहकारमधील अनेक अधिकारी अनुत्सुक होते.
या पार्श्वभूमीवर मौसमी चौगले या महिला अधिकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. लवकरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कडून रीतसर निवडणूक कार्यक्रम तयार करून तो महाराष्ट्र सहकार प्राधिकरणाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल. प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर थेट नामनिर्देशन पत्रे दाखल होण्यास प्रारंभ होईल. त्यानंतर गोकुळ निवडणुकीच्या राजकीय हालचाली अधिकच गतिमान होतील.