

कागल : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते, आमदार सतेज पाटील यांनी कागल तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. तसेच त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील ठरावधारकांच्या वैयक्तिक भेटीगाठीही त्यांनी घेतल्या.
कागल शहरातील जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या निवासस्थानी जाऊन आ. सतेज पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली. त्यानंतर श्रीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी यांचीही त्यांनी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. माजी खासदार संजय मंडलिक तसेच शाहू समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांचीही त्यांनी घरी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. केनवडे येथील माजी सरपंच दत्ता पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली. मुरगूड येथे ठरावधारकांचा मेळावाही झाला. आ. सतेज पाटील यांच्या कागल तालुक्यातील या दौर्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले असून मतविभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे, शाहू समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित पाटील आणि मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या गटांच्या ठरावधारकांच्या बैठका यापूर्वी झाल्या आहेत; मात्र आ. सतेज पाटील यांनी घेतलेल्या ठरावधारकांच्या गाठीभेटींमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
‘गोकुळ’ मध्ये आम्ही महायुतीसोबच : संजय घाटगे
व्हनाळी : राजकारणात कधीही कोणी-कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. कोणीही निवडून आले, तरी सामान्य दूध उत्पादकांचे कल्याण व्हावे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आम्ही आता भाजप पक्षात असल्याने ‘गोकुळ’मध्येदेखील आम्ही महायुती सोबतच राहणार असल्याचे माजी आमदार संजय घाटगे यांनी सांगितले. केनवडे (ता. कागल) येथे अन्नपूर्णा शुगर कारखाना कार्यस्थळावर गोकुळसंदर्भात आ. सतेज पाटील यांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
गोकुळ निवडणुकीत करवीर, राधानगरीचा वरचष्मा
गोकुळ निवडणुकीत नेहमीप्रमाणे यंदाही करवीर व राधानगरी तालुक्याचा वरचष्मा राहणार आहे. अंतिम मतदार यादीत करवीर तालुक्यात ८५९, तर राधानगरी तालुक्यात ६९४ दूध संस्था आहेत. या दोन तालुक्यांत सर्वाधिक ठरावधारक असल्याने येथील नेते व दूध संस्थांचे ठरावधारक यांचे महत्त्व वाढणार आहे.