

कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथील सुरू केलेल्या जातिवंत म्हैस खरेदी- विक्री केंद्राला दूध उत्पादकांचा मिळणार प्रतिसाद पाहून गडहिंग्लज येथे दुसरे विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय गोकुळ संचालकांच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. चीजसह आईस्क्रीमच्या उत्पादनास सुरुवात करण्याचे व वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 9 सप्टेंबर रोजी घेण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले, अशी माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली.
गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 9 सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी सोमवार (दि.18) पासून तालुकानिहाय दूध उत्पादकांच्या संपर्क सभा सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
जातिवंत म्हैस खरेदीस ‘गोकुळ’च्या वतीने अनुदान देण्यात येत असून, दूध उत्पादकांची आर्थिक बचत व्हावी, म्हणून म्हैस विक्री केंद्रही सुरू करण्यात आले आहे. केर्ली येथील केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दुसरे केंद्र सुरू करण्याचा विचार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. दुसरे केंद्र आजरा, चंदगड, गडहिंग्लज या परिसरात सुरू करण्याबाबत चर्चा झाली होती. अखेर गडहिंग्लज विक्री केंद्र सुरू करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. चीज व आईस्क्रीमचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पावसाळा संपल्यानंतर आईस्क्रीम उत्पादनास सुरुवात करण्यात येणार आहे.