

सतीश सरीकर
कोल्हापूर ः विविधतेने नटलेल्या भारतात धर्म, जाती आणि संस्कृतीची भिन्नता असूनही, काही माणसं आपल्या वागणुकीतून या सार्यांमध्ये एक सुंदर सामाजिक समरसतेचा पूल उभा करतात. कोल्हापुरातील एक मुस्लिम कुटुंब याचे जिवंत उदाहरण आहे. या कुटुंबाने गेल्या चार पिढ्यांपासून हिंदू धर्मातील श्रावण महिना पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. या काळात ते मांसाहार वर्ज्य करून सोमवारी उपवास करतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरात श्रावण पाळणार्या अत्तार कुटुंबाने श्रद्धेचा पूल बांधणारी अनोखी परंपरा जपली आहे.
शहरातील टेंबलाईवाडी, सह्याद्री कॉलनी येथील समीर अत्तार यांचे कुटुंब गेली 60 ते 70 वर्षे श्रावण महिना निष्ठेने पाळतात. समीर यांचे आजोबा युसूफ जमाल अत्तार यांनी ही परंपरा सुरू केली. पुढे त्यांचा मुलगा दिलावर यांनी श्रावणाची परंपरा चालविली. दिलावर यांचे 1996 ला निधन झाले. त्यानंतर जन्नतबी दिलावर अत्तार व त्यांचा मुलगा समीर यांनी ही परंपरा सुरू ठेवली. आता अत्तार कुटुंबातील चौथी पिढी असलेला जावेद श्रावणाची परंपरा पुढे ठेवत आहे. हिंदू कुटुंबांप्रमाणेच या महिन्यात ते मांसाहार टाळतात. सोमवारी उपवास करतात. महाशिवरात्रीलाही उपवास केला जातो.
समीर अत्तार यांनी सांगितले की, श्रद्धा ही केवळ धर्मापुरती मर्यादित नसते. आमच्या शेजारधर्मातले लोक श्रावण महिना किती भक्तिभावाने पाळतात, ते आम्ही बालपणापासून पाहत आलो. त्यातच एस. टी. स्टँडजवळील वटेश्वर मंदिर आणि ताराबाई पार्कातील हनुमान मंदिर येथे आमचे उदबत्ती-कापूरचे दुकान आहे. त्यामुळे वडिलांपासूनच आम्हाला श्रावण सोमवारची परंपरा मिळाली. या उपवासामागे आत्मिक श्रद्धेचा भाग आहे.
अत्तार कुटुंबाची ही कहाणी सर्वांसाठी एक संदेश आहे, की श्रद्धा, भक्ती, समर्पण यांना धर्माचे बंधन नसते. समर्पण मनापासून केले की, ते कोणत्याही धर्माच्या चौकटीत सामावते. त्यातूनच खरं ‘इन्क्लुझन’ निर्माण होते. कोल्हापूरसारख्या सांस्कृतिक वैविध्याने भरलेल्या शहरात ही परंपरा समाजात सलोखा आणि प्रेम वृद्धिंगत करत आहे.
अत्तार यांचा मुलगा जावेद या परंपरेत मनापासून सहभागी होतो. त्याला काही मित्रांनी विचारले की, मुसलमान असून श्रावण कसा पाळता, तेव्हा त्यांनी फक्त एकच उत्तर दिलं, ‘श्रद्धा ही धर्माधारित नसते, ती मनातून निघालेली असते. आई-वडिलांनी सुरू केलेली ही परंपरा आम्हाला मान्य आहे आणि अभिमान वाटतो की, आम्ही एका समजूतदारतेचा मार्ग स्वीकारला आहे.’