कोल्हापूर : गावडे विद्यापीठाचा राज्यभर शाखाविस्तार!

कोल्हापूर : गावडे विद्यापीठाचा राज्यभर शाखाविस्तार!
Published on
Updated on

कोल्हापूर, सुनील कदम : दहावी-बारावीसह कोणत्याही परीक्षेची बनावट गुणपत्रिका देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील शिगाव येथील गावडे विद्यापीठाने राज्यभर आपला शाखाविस्तार केल्याचे दिसत आहे. परिणामी, राज्यभरातून पुन्हा एकदा बनावट गुणपत्रिकांची प्रकरणे चव्हाट्यावर येताना दिसत आहेत.

चार दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी दहावी-बारावीची बनावट गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे देणार्‍या टोळीचा पर्दापाश करून चारजणांना अटक केली होती. या चौघांपैकी एकजण संदीप कांबळे हा सांगली जिल्ह्यातील दुधारी येथील आहे. मुंबई पोलिसांनीही बनावट गुणपत्रिका देणारी एक टोळी नुकतीच गजाआड केली आहे. काही दिवसांपूर्वी बीड आणि संभाजीनगर भागातही बनावट गुणपत्रिकांची काही प्रकरणे चव्हाट्यावर आली होती. विशेष म्हणजे, या प्रत्येक टोळीचे सांगली कनेक्शनही त्या त्यावेळी दिसून आले आहे. यावरून पूर्वी सांगली जिल्ह्यापुरते मर्यादित असलेले गावडे विद्यापीठ आता राज्यव्यापी झाल्याचे दिसत आहे.

1970 च्या दशकात शिगाव येथील गावडे नामक एका प्राथमिक शिक्षकाने बनावट गुणपत्रिका देणार्‍या या गोरखधंद्याची सुरुवात केली होती. त्यामुळे अशी बनावट गुणपत्रके मिळविणार्‍यांना गमतीने गावडे युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असे म्हटले जायचे. सुरुवातीला गावडे महाशयांनी सातवी पासचे बोगस दाखले देऊन या विद्यापीठाचा पाया घातला. गावडेंनी काळाची पावले ओळखून दहावी-बारावीची बोगस प्रमाणपत्रे देण्याचा सपाटा लावला.

कालांतराने गावडे यांनी काळानुरूप अनेक कसबी कारागीर आपल्या विद्यापीठात भरती केले आणि संगणकावर कोणत्याही बोर्डाची किंवा विद्यापीठाची अगदी हुबेहुब प्रमाणपत्रे गावडे विद्यापीठातून बाहेर पडायला लागली. आजपर्यंत किमान पाच लाखांहून अधिक लोक गावडे विद्यापीठाचे लाभार्थी असल्याचा बोलबाला आहे.

काही वर्षांपासून गावडे महोदयांनी आपला हा गोरखधंदा बंद करून टाकला आहे; पण त्यांच्याच विद्यापीठात धडे गिरवलेले शेकडो जण सांगली जिल्ह्यात आणि राज्यातही आहेत.

खासगी नोकर्‍यांमध्ये प्राधान्याने वापर!

शासकीय नोकरीत कधी ना कधी संबंधितांच्या गुणपत्रिकेची किंवा प्रमाणपत्रांची पडताळणी ही होतेच, त्यामुळे केव्हा ना केव्हा ही चोरी उघडकीला येतेच. मात्र, खासगी नोकरीमध्ये अशा पद्धतीने संबंधितांच्या प्रमाणपत्रांची तितक्या कसोशीने पडताळणी होत नाही. गावडे विद्यापीठाचे कारनामे फारसे चव्हाट्यावर येत नाहीत; पण शासकीय नोकरीप्रमाणेच खासगी ठिकाणी नोकरी करणार्‍यांच्या प्रमाणपत्रांचीही पडताळणी सुरू झाली, तर गावडे विद्यापीठाचे हजारो-लाखो लाभार्थी चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news