Gavlani Tradition | गवळणी परंपरा लोप पावतेय! श्रमसंस्कृती जपणारी 'गवळणी' प्रथा का महत्त्वाची?

Gavlani Tradition | या काळात आपल्या श्रमांचे, संस्कारांचे आणि ग्रामीण स्त्रीशक्तीचे सुंदर प्रतिबिंब अनेक पारंपरिक विधींमधून दिसून येते.
Gavlani Tradition
Gavlani Tradition Canva
Published on
Updated on

Gavlani Tradition

दिवाळीचे पाच दिवस हा केवळ आनंदाचा आणि रोषणाईचा उत्सव नसतो, तर तो आपल्या मातीतील ग्रामसंस्कृती आणि कृषी संस्कृतीवर आधारित प्रथा-परंपरांमधून समृद्ध लोकजीवनाचे दर्शन घडवणारा महत्त्वपूर्ण काळ असतो. या काळात आपल्या श्रमांचे, संस्कारांचे आणि ग्रामीण स्त्रीशक्तीचे सुंदर प्रतिबिंब अनेक पारंपरिक विधींमधून दिसून येते. मात्र, याच ग्रामसंस्कृतीचा एक महत्त्वाचा आणि कलात्मक ठेवा असलेली गवळणी परंपरा आता हळूहळू लोप पावण्याच्या मार्गावर आहे.

Gavlani Tradition
Leopard Attack or Murder|बिबट्याचा हल्ला की घातपात? दांपत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

ग्रामीण जीवनाचे जिवंत चित्रण

मुलांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा संपताच वसुबारसपासून दिवाळीचा मंगलमय शुभारंभ होतो. धनत्रयोदशीच्या दिवसापासून घराघरात स्वच्छता करून अंगणात आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात. याच वेळी, अनेक गावांमध्ये गाईच्या शेणापासून बाहुलीसारख्या गवळणी तयार करण्याची पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली परंपरा आहे.

या गवळण्यांमध्ये ग्रामीण दैनंदिन जीवनाचे जिवंत चित्रण केलेले असते. यामध्ये पेदा, बळीराजा, जात्यावर दळणाऱ्या स्त्रिया, गुरे राखणारे शेतकरी, कमरेवर घागर ठेवून पाणी आणणाऱ्या महिला, स्वयंपाक करणाऱ्या आणि धान्य दळणाऱ्या स्त्रिया अशा अनेक ग्रामीण व्यक्तीरेखा साकारल्या जातात. आजी किंवा आई मोठ्या प्रेमाने आणि कलात्मकतेने या गवळणी तयार करतात. तयार झाल्यावर या कलाकृतींवर फुले, हळद–कुंकू वाहून नैवेद्य दाखवला जातो आणि संपूर्ण अंगण एका वेगळ्याच प्रसन्नतेने उजळून निघते.

Gavlani Tradition
Almatti Dam | ‘अलमट्टी’वरून चार राज्यांत संघर्षाची चिन्हे!

पांडव पंचमीचा धार्मिक विधी

दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवात, पाचव्या दिवशी पांडव पंचमी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी गाईच्या शेणापासून पाच पांडवांच्या मूर्ती बनवल्या जातात आणि त्यांच्या समोर देवीची मूर्ती ठेवून तिची पूजा केली जाते. या विधींमधून ग्रामीण महिलांची कलात्मकता आणि धार्मिक श्रद्धा यांचा संगम पाहायला मिळतो.

परंपरा लोप होण्याची कारणे

कालांतराने ग्रामीण भागातील जीवनशैली बदलली आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्यामुळे आणि कुटुंबांचे स्थलांतर झाल्यामुळे गावांमध्ये गाय–गुरांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे पूजेसाठी आवश्यक असलेले शेण सहज उपलब्ध होत नाही.

याचसोबत, आजच्या आधुनिक पिढीतील तरुणाई आणि महिलांना शेणात हात घालून या गवळणी तयार करण्यात संकोच वाटू लागला आहे. यामुळे, एकेकाळी मोठ्या उत्साहात आणि सामूहिकपणे साजरी होणारी ही सुंदर परंपरा आता लोप पावत चालली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील कासेगावसारख्या काही मोजक्या गावांतच या प्रथांचा मागमूस पाहायला मिळतो.

ग्रामसंस्कृतीचा हा ऐतिहासिक आणि कलात्मक वारसा पुढील पिढ्यांना परिचित राहावा यासाठी या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे, त्याला आधुनिकतेची जोड देऊन तरुण पिढीला यात सहभागी करणे, ही आजच्या काळाची खरी गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news