

कोल्हापूर : ती काळी रात्र... तो भीषण अपघात... आणि डोळ्यांदेखत रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आपलं हसतं-खेळतं विश्व. अडीच वर्षांपूर्वी पिरवाडी घाटात नियतीने जो क्रूर डाव मांडला, त्या जखमेतून तो कधी सावरलाच नाही. पत्नी आणि दोन पोटच्या गोळ्यांच्या विरहाची आग काळजात घेऊन जगणार्या एका अगतिक पित्याने, अखेर त्याच मृत्यूच्या वळणावर आपल्या आयुष्याचा शेवट केला. विराट विठ्ठललाल गौतम (वय 58, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) असे जीवन संपवलेल्या या असहाय पित्याचे नाव.
23 नोव्हेंबर 2023 रोजी गोव्याच्या सहलीचा आनंद घेऊन पुण्याकडे परतणार्या एका निमआराम बसला पिरवाडी घाटात भीषण अपघात झाला होता. या अपघातात विराट यांची पत्नी नीलू (48), मुलगी रिद्धीमा (17) आणि मुलगा सार्थक (13) यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघात घडल्यानंतर तातडीने मदत न मिळाल्याने डोळ्यांदेखत पत्नी व मुलांना मृत्यूच्या दाढेत जाताना पाहिल्यामुळे विराट यांना धक्का बसला होता.
कोल्हापुरातील पुईखडी परिसरात झालेल्या अपघातात पत्नीसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याने विराट गौतम अतिशय खचलेल्या अवस्थेत जगत होते. नियतीने दिलेला हा घाव विराट कधीच विसरू शकले नाहीत. पत्नी आणि दोन मुलांच्या विरहाने आतून पूर्णपणे तुटून गेलेल्या या पित्याने अखेर त्याच घाटात जीवन संपवून मृत्यूला कवटाळले. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
23 नोव्हेंबर कधीच चुकला नाही
कुटुंबाच्या आठवणींनी व्याकूळ झालेले विराट दरवर्षी 23 नोव्हेंबरला पिरवाडी घाटात येत असत. ज्या ठिकाणी आपल्या काळजाचे तुकडे हरवले, त्या मातीवर डोके ठेवून ते ढसाढसा रडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. 10 मे रोजी ते पुन्हा त्या घाटात आले आणि यावेळी कायमचेच थांबले. त्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटवली. ज्या मातीने त्यांचे सर्वस्व हिरावून घेतले, त्याच मातीने अखेर त्यांना आपल्या कुशीत घेतले. एका सुखी कुटुंबाचा असा करुण अंत पाहून अनेकजण सुन्न झाले.
काळीज पिळवटून टाकणारे शब्द
‘आज कोल्हापूर में देह त्याग कर दिया है... पता नहीं कैसे जी रहा हूँ... कुछ लोग दुनिया में ऐसे होते है, जिनके बिना जीना मुश्किल लगता है...’ आज कोल्हापुरात मी देह अर्पण केला आहे... मी कसा जगत होतो हे मलाच माहीत नाही. जगामध्ये काही माणसे अशी असतात, ज्यांच्याशिवाय जगणे अशक्य होऊन बसते. मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीतले हे शब्द. या शब्दांनी पोलिस अधिकार्यांच्याही डोळ्यांत पाणी आणले.
अडीच वर्षांचा विरह...
तब्बल अडीच वर्षांचा काळ लोटला तरी विराट यांच्या मनातून त्या काळरात्रीच्या किंकाळ्या आणि रक्ताने माखलेली पत्नी-मुलांचे शरीर पुसले गेले नव्हते. अपघातानंतर दरवर्षी 23 नोव्हेंबरला ते पिरवाडी घाटात येत. ज्या ठिकाणी आपल्या काळजाचे तुकडे हरवले, त्या मातीवर डोके टेकवून ढसाढसा रडत. 10 मे रोजी ते पुन्हा त्याच ठिकाणी आले; पण यावेळी ते परतण्यासाठी नव्हे, तर कायमचे त्यांच्याकडे जाण्यासाठीच आले होते.