

सुभाष पाटील
विशाळगड : शाहुवाडी तालुक्यातील गजापूर पैकी दिवाणबाग येथील रहिवासी ज्ञानू मुकुंद भारती (वय ७२) यांचे राहते घर अचानक कोसळल्याने हे वृद्ध कुटुंब अक्षरश: बेघर झाले आहे. ही भीषण घटना शाहुवाडी तालुक्यात घडली असून, नशीब बलवत्तर म्हणून घरात उपस्थित असलेले वृद्ध ज्ञानू भारती आणि त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावले. मात्र, या दुर्घटनेत त्यांचे संपूर्ण संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे, परिणामी हे कुटुंब सध्या हतबल आणि उघड्यावर पडले आहे.
वृद्ध ज्ञानू भारती आणि त्यांची पत्नी घरात असतानाच आवाज आला. त्यांना धोक्याची जाणीव होताच ते तात्काळ घराबाहेर पडले आणि पुढच्या काही क्षणांतच त्यांचे घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. सुदैवाने त्यांचा मुलगा अनिल भारती हा घटनेच्या वेळी बाहेर फिरायला गेल्याने तोही बचावला.
ज्ञानू भारती कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. बेघर योजनेतून घर मिळावे यासाठी त्यांनी प्रशासनाकडे वारंवार अर्ज आणि हेलपाटे मारले होते, पण त्याची योग्य दखल घेतली गेली नाही. जर वेळेत त्यांना घर मिळाले असते, तर ही दुर्घटना टळू शकली असती, अशी खंत kभारती कुटुंबियांनी 'पुढारी न्यूज 'शी बोलताना व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच तलाठी घनश्याम स्वामी आणि ग्रामसेवक युवराज माने यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजयसिंह पाटील यांच्या मदतीने तात्काळ पंचनामा पूर्ण केला आहे. आता पंचनामा झाला असला तरी, शासनाने तातडीने या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
"या घटनेमुळे आमचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. आता राहायचं कुठं, हाच प्रश्न आम्हाला सतावतोय. माय-बाप सरकारने आम्हाला आधार द्यावा आणि घर उभारणीसाठी तातडीने मदत करावी. बेघर योजनेतून घरासाठी वारंवार हेलपाटे मारूनही आजवर दखल घेतली गेली नाही, याची खंत आहे."
ज्ञानू मुकुंद भारती, नुकसानग्रस्त वृद्ध
"ज्ञानू भारती यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांचे झालेले नुकसान मोठे आहे. शासनाने त्वरित या घटनेची नोंद घेऊन त्यांना तातडीची आर्थिक मदत आणि बेघर योजनेतून प्राधान्याने घरकुल मंजूर करावे, समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी."
संजयसिंह पाटील, सामाजिक कार्यकर्ते, गजापूर