

विशाळगड : सर्वधर्मीयांच्या एकात्मतेचे प्रतीक असलेल्या किल्ले विशाळगडावरील हजरत पीर मलिक रेहान उरूस रविवार, दि. 8 ते मंगळवार, दि. 10 या तीन दिवसांच्या कालावधीत होत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने गडावर सण, इतर धार्मिक कार्यक्रम करण्यास ऐन उरूस काळात बंदी घातल्याने उरुसावर बंदीचे सावट होते. परिणामी, स्थानिक पुजार्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात आले.
‘मलिक रेहानबाबा की एक साथ धीन’च्या जयघोषात उरुसाच्या पहिल्या दिवशी बाबांच्या तुरबतीला चुना व चादरी वाहण्याचा धार्मिक विधी दर्गा पुजारी इम—ान मुजावर यांच्या हस्ते पार पडला. हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला. उरुसास महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. तसेच गडाला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असल्याने हिंदू-मुस्लिम भाविकांची मोठी गर्दी असते. वर्षातून दोनदा उरूस भरतो. पहिला उरूस बकरी ईदनंतर येतो, तर दुसरा उरूस जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात भरतो. उरूस तीन दिवस चालतो. रविवारी उरुसाचा पहिला दिवस होता.