

गडहिंग्लज : येथे परप्रांतीय कामगाराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाल्याने दोन दिवसांपूर्वी दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाले होते. या घटनेच्या मूळाशी जात शनिवारी माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी पीडित बालिकेसह तिच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पोलिस व वैद्यकीय प्रशासनावर आरोप करताना सदर बालिकेचा केवळ विनयभंग झाला नसून, तिच्यावर अत्याचार झाला आहे.
प्रशासनाने या प्रकरणी हलगर्जीपणा केला असून, या पाठीमागे कुणाचा तरी हात असल्याचा गंभीर आरोप केला. तर याच पार्श्वभूमीवर आम्ही गडहिंग्लजकर व्यासपीठाखाली एकत्र आलेल्या नागरिकांनी उद्या, रविवार (ता. १) गडहिंग्लज शहर बंदची हाक दिली आहे. सकाळी ९ वाजता शहरातून निषेध फेरी काढण्यात येणार आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला शेहजाद शेख (वय २६) व त्याचा मालक बरकतअली रईस पाशा (दोघेही रा. उत्तरप्रदेश) या दोघांविरोधात पोक्सो अंतर्गत विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहे. मात्र आता मुलीच्या वैद्यकीय चाचणीनंतर बलात्काराच्या गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले आहे. दरम्यान, आ. हसन मुश्रीफ यांनीही गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर यांना फोन करुन या प्रकरणात तातडीने हालचाली करुन नराधम आरोपीला तातडीने अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.