

गडहिंग्लज : येथील पीओपीचे काम करणार्या बरकतअली रईस पाशा (सध्या रा. गडहिंग्लज, मूळगाव उत्तरप्रदेश) या ठेकेदाराकडे असलेल्या शहेजाद शेख (रा. उत्तरप्रदेश) या २६ वर्षीय कामगाराने त्यांच्या दुकानालगत असलेल्या एका अल्पवयीन १२ वर्षीय मुलीची दोन दिवसापूर्वी छेड काढली होती. हा प्रकार गुरुवारी गडहिंग्लज शहरातील नागरिकांच्या लक्षात येताच हिंदुत्ववाद्यांनी एकत्र येऊन सदर प्रकाराविरुद्ध संबंधित ठेकेदाराला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याने सदर प्रकार झाल्यानंतर संबंधित कामगाराला मी मारले असून, तो पळून गेल्याचे सांगितल्यावर जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने ठेकेदाराच्या दुकानावर हल्ला करुन त्या दुकानाची मोडतोड केली.
दरम्यान, जमाव मोठ्या प्रमाणात संतप्त होऊन पोलिस ठाण्याकडे आला. या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थितीत दोघांवर गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केल्याशिवाय हलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या आवारात सुमारे तासभर जोरदार दंगा सुरु होता. पोलिस निरीक्षक होडगर यांनी संतप्त जमावासमोर येऊन मुलीच्या नातेवाईकांची फिर्याद घेऊन या प्रकरणी कारवाई करतो, असे सांगितल्यावरही जमाव ऐकण्यास तयार नव्हता.
मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आप्पा शिवणे यांनी जोवर गुन्हा दाखल करणार नाही, तोवर एकही नागरिक येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. मनसेचे नागेश चौगुले, संतोष चिकोडे यांनीही या प्रकरणी कारवाई कराच, तोवर जमाव हलणार नाही, असे स्पष्ट केल्याने पोलिसांनीही आम्ही गुन्हा दाखल करुन घेतच आहोत, फक्त मुलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्याशिवाय पुढील कार्यवाही होणार नसल्याची भूमिका मांडली.
सुमारे तासाभरानंतर मुलीच्या नातेवाईकांना पोलिस निरीक्षकांच्या कक्षात घेऊन या प्रकरणी फिर्याद दाखल केली. यामध्ये मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादनुसार आठ दिवसांपूर्वी सदर शेख याने मुलीचा कपडे धूत असताना मोबाईलवर फोटो काढला होता. मुलीने फोटो डिलीट कर असे म्हणताच त्याने तिचा हात पकडून विनयभंग केला. सदर प्रकार मालक बरकत याला माहीत झाल्यावर या प्रकरणी पोलिसांत न जाता परस्पर प्रकरण मिटल्याचे सांगून आरोपी शेख याला मदत केल्याने या दोघांविरोधात पोक्सो व विनयभंगा अंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
दरम्यान, एफआयआर दाखल होत नाही, तोवर या ठिकाणाहून हलणार नाही, अशी भूमिका हिंदुत्ववाद्यांनी घेतल्याने पोलिस ठाणे परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिस ठाण्यातील सर्व पोलिसांना ही गर्दी हटविण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागत होते. मात्र नागरिक हे पुन्हा पुन्हा पोलिस ठाण्यासमोर येऊन गुन्हा दाखल झाला काय, याची विचारणा करीत होते. शेवटी गुन्हा दाखल झाल्यावर नागरिक माघारी परतले. गडहिंग्लजला झालेल्या या प्रकाराने मात्र जोरदार चर्चा सुरु झाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.