

Chandgad Tractor Seized
चंदगड : चंदगड-गडहिंग्लज राज्य मार्गावरील वाळकोळी फाटा (ता. चंदगड) येथे विनापरवाना इमारतीच्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत लाकडांसह ट्रॅक्टर आणि अन्य साहित्य असा एकूण ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चंदगड वनपरिक्षेत्राच्या गस्ती पथकाला वाळकोळी फाटा येथे विनापरवाना लाकडाची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी ट्रॅक्टरचालक दीपक निवृत्ती गावडे (रा. दाटे, ता. चंदगड) याच्याकडे लाकूड वाहतुकीचा आवश्यक परवाना नसल्याचे निदर्शनास आले. बेकायदेशीरपणे लाकूड तोडून त्याची वाहतूक केली जात असल्याने वनविभागाने ट्रॅक्टरसह लाकूड आणि अन्य साहित्य जप्त केले. याप्रकरणी चालकाविरुद्ध वन अधिनियमानुसार चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चंदगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार गायकवाड, वनपाल भारत खुटाले, वनरक्षक रणजीत पाटील आणि वनसेवक नितीन नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली.