विशाळगडावर आंदोलन प्रकरणी ५०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल?

पोलिसांनी केलेल्या चित्रीकरणातून आणखी संशयितांवर होणार गुन्हे दाखल
Vishalgarh Encroachment Movement
विशाळगडावर आंदोलन प्रकरणी ५०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विशाळगड अतिक्रमणमुक्तीच्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. गजापूर ते विशाळगड या सुमारे पाच किलोमीटर परिसरात प्रचंड दगडफेक, तोडफोड करण्यात आली. घरे, दुकानांसह मशिदीला लक्ष्य करत आंदोलकांनी हल्लाबोल केला. दुकाने, वाहनांसह काही घरांची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न झाला. याप्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये ५०० हून अधिक जणांवर रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आणखी नावे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत.

विशाळगडावरील अतिक्रमणे काढावी, अशी मागणी काही वर्षांपासून केली जात आहे. या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांसह विविध संघटनांची सातत्याने आंदोलनेही होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गेल्यावर्षी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. मात्र, त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. ही अतिक्रमणे काढण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेत विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राज्यभरातील शिवभक्तांना हाक दिली होती. त्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त दोन दिवसांपासून विशाळगड परिसरात येत होते. काही शिवभक्त तर शनिवारी रात्रीपासूनच विशाळगडावर आणि परिसरात मुक्कामाला थांबले होते. संभाजीराजेंसह शेकडो कार्यकर्ते व शिवभक्तांच्या वाहनांचा ताफा विशाळगडाच्या दिशेने रवाना झाला. तत्पूर्वीच विशाळगडावर पोहोचलेल्या शिवभक्तांच्या एका गटाने मलिक रेहानबाबा दर्गा आणि परिसरातील घरांवर दगडफेक केली. काही घरे, दुकानांचीही तोडफोड केली. अचानक झालेल्या या प्रकाराने प्रचंड घबराट उडाली. लहान मुले, महिलांसह नागरिकांची आरडाओरड सुरू झाली. या दगडफेक करणार्‍यांना पिटाळून लावण्यासाठी काहींनी प्रतिहल्ला केला. बंदोबस्तावर असणार्‍या पोलिसांनी दगडफेक करणार्‍यांवर लाठीमार सुरू केला. सुमारे पंधरा-वीस मिनिटे लाठीमार करत दगडफेक करणार्‍यांना पिटाळून लावण्यात पोलिसांना यश आले.

गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ः पंडित

अतिक्रमणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. यामुळे आंदोलन करू नये, अशी विनंती करण्यात आली होती. या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नव्हती. आंदोलकांनी घरे, दुकाने, प्रार्थनास्थळांची केलेल्या तोडफोडप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी रविवारी रात्री सांगितले. झालेल्या नुकसानीचे पोलिस आणि महसूल विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. सोशल मीडिया आणि पोलिसांनी केलेल्या चित्रीकरणातून संशयितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. याकरिता पथक तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवभक्तांनी आक्रोश दाखवून दिला

विशाळगड किल्ल्याचे असाधारण महत्त्व आहे. या किल्ल्याने खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे रक्षण केले. स्वराज्याच्या राजधानीपैकी विशाळगड ही एक राजधानी होती. अशा ठिकाणी ज्या गलिच्छ पद्धतीने अतिक्रमण झाले आहे, हे कोणी खपवून घेऊ शकत नाही. मद्यपान, पत्त्याचा डाव, कत्तलखाना यासह अनेक गैरप्रकारही चालत होते. याचा शिवभक्तांत अनेक वर्षांपासून आक्रोश होता, तो आज त्यांनी दाखवून दिला. ज्या गोष्टी घडल्या त्या मान्य आहे; पण मी शिवभक्तांना दोषी म्हणणार नाही. सरकारने अतिक्रमणाबाबत निर्णय यापूर्वीच घेतले असते, तर हा प्रसंग घडला नसता. हा विषयच आला नसता. मी दीड वर्षापासून लढतोय. हा लढा अनेक दशकापासून अनेक संघटनांनी उभा केला. सरकारला वाटत असेल मी दोषी आहे, तर गुन्हा दाखल करा, असे संभाजीराजे यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले.

हत्यारे बाळगणार्‍यांची चौकशी होणार

विशाळगडावर दोन्ही बाजूंच्या जमावाकडे हत्यारे होती का, याची सखोल चौकशी आता पोलिस प्रशासनाकडून केली जाणार आहे. पोलिस त्याद़ृष्टीने तपास करणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हत्यारे विशाळगडवर पोहोचलीच कशी, याबाबतही आता चौकशी करावी लागणार आहे.

दहशतीपुढे पोलिसही हतबल

पहाटे चारपासून भरपावसात पोलिसांना विशाळगड परिसरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते; पण जमावाची दहशत इतकी होती की, पोलिसही हतबल झाले होते. समोर हल्ले सुरू होते. मोडतोड सुरू होती. आडवायला जाणार्‍या पोलिसांनाही जमावाकडून दमदाटी केली जात होती. गजापूर ते विशाळगडच्या पायथ्यापर्यंत फक्त जमावाचीच दहशत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news