कुरुंदवाड : फटाके उडवण्याच्या वादातून मिरवणुकीत नाचवल्या नंग्या तलवारी, दोन गटांत तुंबळ हाणामारी

कुरुंदवाड : फटाके उडवण्याच्या वादातून मिरवणुकीत नाचवल्या नंग्या तलवारी, दोन गटांत तुंबळ हाणामारी
Published on
Updated on

कुरुंदवाड (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा : मजरेवाडी (ता. शिरोळ) येथे पालखी मिरवणुकीसमोर फटाके उडवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी एकमेकांवर दगडफेकीसह नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शनिवारी ( दि. ७) पहाटे ४ च्या सुमारास घडली. याप्रकरणी ३२ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दगडफेकीत आसावरी ढोणे या मुलीच्या पायाला दुखापत झाली आहे. तर तलवार लागून जखमी झालेले राजेंद्र कागले यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मजरेवाडी येथे लक्ष्मी देवीची यात्रा सुरू आहे. शनिवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास देवीची पालखी मिरवणूक सरकारसाहेब चौकात आली. यावेळी एका गटाला फटाके उडविण्यास दुसऱ्या गटाने मज्जाव केला. त्यामुळे या दोन दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाली. याचे रुपांतर हाणामारी व दगडफेकीत झाले.

दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांनी नंग्या तलवारी आणून दहशत माजवली. यावेळी झालेल्या झटापटीत राजेंद्र कागले यांच्या डोक्यावर तलवारीचा वार झाला. तर दगडफेकीनंतर झालेली आरडाओरड ऐकून वडिलांना घेण्यासाठी आलेल्या आसावरी ढोणे या युवतीच्या पायाला दगड लागला आणि ती जखमी झाली. अखेर तब्बल २ तास सुरू असलेली हाणामारी गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी सोडवली. पण, पुन्हा पहाटे चार वाजता काही युवकांनी एका गटाच्या आयलँडवर हल्ला चढवत तोडफोड करून फरश्या फोडल्या. त्यामुळे पुन्हा वादावादीला सुरूवात झाली.

यानंतर काही ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली असता घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, अमित पाटील यांनी धाव घेऊन जमाव पांगवला. पोलिसांनी ३२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या मजरेवाडीत तणावपूर्ण वातावरण असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

६ महिन्यात दुसऱ्यांदा नंग्या तलवारी फिरवत दहशत..

सहा महिन्यापूर्वी मजरेवाडी येथील पेट्रोलपंपाजवळ शेताच्या वादातून दोन गटात वादावादी झाली होती. मजरेवाडीतील काही युवकांनी नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवली होती. त्यानंतर शनिवारी पहाटे पुन्हा नंग्या तलवारी गावात फिरवल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news