

नृसिंहवाडी, पुढारी वृत्तसेवा : आंदोलन अंकुशच्या वतीने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वर्गणीतून शिरोळ – नृसिंहवाडीरोडवर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला शेतकरी वजन काटा उभारला जात आहे. या काट्यासाठी एका शेतकऱ्याने जागा दिली असून या जागेवरील जमिनीचे सपाटीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
हा काटा उभारला जात आहे, त्या रस्त्यावरून महाराष्ट्रातील ६ तसेच कर्नाटकातील राज्यातील ४ कारखान्यांची ऊस वाहतूक होत असते. 18 मीटर लांब व 80 टन क्षमतेचा हा वजन काटा उभारला जाणार आहे, या वजन काट्यासाठी गावोगावातील शेतकऱ्यांकडून वर्गणी उभा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यास शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीचा वजन काटा असावा, अशी या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची भावना होती. त्या भावनेतूनच शेतकरी वजन काटा उभारण्याचा संकल्प आंदोलन अंकुशने केला होता. त्यानुसार शिरोळ नृसिंहवाडी रस्त्यावर वजन काटा उभारणीसाठी नारायण उर्फ रामचंद्र गेंडे या शेतकऱ्याने जागा दिली आहे.
शिरोळ तालुक्यात येत्या हंगामात हा वजन काटा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी अंदाजे २० लाख रुपये खर्च येईल. शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ३ लाख रुपये वर्गणी जमा झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करेक्ट वजन होण्यात याचा फायदा होईल.
– धनाजी चुडमुंगे, अंकुश आंदोलनचे प्रमुख
हेही वाचा