राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापूरबाबत दुजाभाव का? | पुढारी

राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापूरबाबत दुजाभाव का?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्याचा आज अर्थसंकल्प जाहीर झाला. त्यात कोल्हापूरला काहीही ठोस मिळाले नाही. कोल्हापूरला निधी देण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईची नगरी आणि लोकराजा शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरबाबत निधी देण्याबाबत दुजाभाव का? असा सवाल काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या पाच आमदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन अर्थसंकल्पात कोल्हापूरसाठी निधी देण्याची मागणी केली होती. शाहू मिल येेथील आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील उर्वरित कामे, पंचगंगा प्रदूषणमुक्ती, अभियांत्रिकी महाविद्यालय आदींसाठी निधी. यासह महापूर व अतिवृष्टीबाधित 16 रस्त्यांसाठी 100 कोटी तर अंतर्गंत रस्त्यांसाठी 165 कोटींचा निधीची मागणी करण्यात आली होती.

शिवाजी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी जाहीर झालेल्या निधीपैकी प्रलंबित निधी, जिल्हा क्रीडा संकुल, सुरक्षित शहर टप्पा क्रमांक दोनसाठी निधी, ब्रिटिशकालीन पूल जतन करण्यासाठी तसेच तेजस्विनी बस योजनेतून शहरासाठी बसेस द्याव्यात, माणगाव परिषदेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने त्याकरिता केशवराव भोसले नाट्यगृहासाठी तसेच कन्वेशन सेंटरसाठी निधी द्यावा, आदी मागण्याही या पत्राद्वारे केल्या होत्या. मात्र, नागपुरातील क्रीडा संकुलासाठी 100 कोटी दिले. राज्यातील अन्य विद्यापीठांसाठी भरीव तरतूद केली. सर्क्युलर इकॉनॉमी पार्क सहा जिल्ह्यांत उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, औद्योगिकद़ृष्ट्या प्रगत असलेल्या कोल्हापूरला मात्र त्यातून वगळण्यात आल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

Back to top button