

पेठवडगाव : चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर दुपारी बारापासून चक्का जाम आंदोलन सुरू केले.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह बेळगाव सीमाभागातील हजारो शेतकरी महामार्गावर उतरले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टोलनाक्यावरील बूथवरच ठिय्या मांडत मागणी मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली. दरम्यान, पूर्ण दिवसभरात आंदोलन मिटविण्यासाठी शासनाने कोणताही प्रयत्न न केल्याने पुढचे पाऊल म्हणून मुंबईकडे जाणारे दूध व भाजीपाला रोखण्याचा इशारा देण्यात आला.
यंदाच्या गळीत हंगामासाठी तुटणाऱ्या उसाला विनाकपात ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे छावणी आंदोलन सुरू आहे. यादरम्यान, प्रशासन आणि साखर कारखानदारांबरोबर चर्चेच्या दोन फेऱ्या होऊनही तोडगा न निघाल्याने संघटनेने महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी शेट्टी यांच्यासह शेतकरी किणी नाक्यावर दाखल झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेट्टी यांनी टोलनाक्यावरील बूथवरच ठिय्या मांडला. साखर कारखानदार व शासन संगनमताने शेतकऱ्यांची लुबाडणूक करत असल्याचा आरोप करत कदाचित दिवाळीसुद्धा इथेच साजरी करावी लागली तरी चालेल पण पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळाल्याशिवाय येथून हलणार नसल्याचा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला. आतापासून स्वाभिमानी सविनय कायदेभंग चळवळ सुरू करणार असून, टोल नाक्यावर सत्याग्रह करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.