

कोल्हापूर : शेतकर्यांचा प्रचंड विरोध असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीतर्फे मंगळवारी (दि. 1) कृषिदिनी महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गास सुरुवातीपासून विरोध होत आहे. त्यामुळे मधल्या काळात या मार्गास कोल्हापूरपुरती स्थगिती दिली आहे.
12 जिल्ह्यांतून जाणार्या शेतकर्यांची लाखो हेक्टर जमीन जाणार आहे त्यामुळे शेतकर्यांनी त्याला विरोध केला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महामार्गावर शिक्कामोर्तब करून 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शेतकर्यातून पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे.
शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. 12 जिल्ह्यांत एकाच वेळी महामार्ग रोखण्याचा निर्णय नुकत्याच दूरदृष्टी प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोल्हापुरात मंगळवारी सकाळी 11 वाजता शिरोली येथील पंचगंगा पुलावर महामार्ग रोखण्यात येणार आहे. या आंदोलनात कृती समितीसह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. शेतकर्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.