पुढारी ऑनलाईन डेस्क : मान्सून राज्यात दाखल झाल्याने बळीराजा आनंदी आहे. शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरूवात केली आहे. परंतु, हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के.एस.होसाळीकर (Farmer's News) यांनी पावसाचा जमीनीतील ओलावा, वातावरण आणि पावसाचा अंदाज पाहूनच पेरणीची घाई करावी, अन्यथा पावसाची वाट बघावी, असा सल्ला राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाेलताना डॉ. होसाळीकर म्हणाले की, "गतवर्षापेक्षा यंदा नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. यंदा मान्सूनवर 'ला निना'चा प्रभाव असल्याने समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. दरम्यान यंदाच्या पावसाच्या हंगामात मध्य भारत आणि दक्षिण द्विपकल्पीय भारतात पावसाचे प्रमाण सर्वसामान्यपेक्षा अधिक असणार आहे. जून महिन्यात राज्यात अधिक पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. याचा बळीराजाला देखील चांगलाच फायदा (Farmer's News) होणार आहे.
मान्सून देखील वेळेपूर्वीच २ दिवस लवकर दाखल झाल्याने राज्यातील शेतकरी वर्ग आनंदी आहे. या आधारावर शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी अवकाळी पाऊस, दुबार पेरणीच्या संकंटांचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकंटाला सामोरे जावे लागले, त्यामुळे पाऊस आणि हवामानाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करणे यंदा फायद्याचं ठरणार असल्याचे हवामान आणि कृषी तज्ज्ञ (Farmer's News) सांगतात.
'१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये'; कृषीअधिकारी
मान्सूनच्या आगमनाने शेतकरी आनंदी झाला आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे जमीनीत ओलावा आहे. यावर शेतीची अंतर्गत मशागत करता येईल. पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही. परंतु, ज्या भागात पाणी नाही किंवा शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांनी १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कोल्हापूरचे कृषी जिल्हा अधीक्षक अरूण भिंगारदेवे यांनी 'पुढारी' ऑनलाईनशी बोलताना दिला.