

कोल्हापूर : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारच असल्याचे स्पष्ट संकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले. बागायती क्षेत्र वगळून या महामार्गासाठी नवी अलायमेंट (नवा मार्ग) करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुश्रीफ म्हणाले, शेतकर्यांचाच विरोध होता म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग विधानसभा निवडणुकीवेळी रद्द केला होता. तसे नोटिफिकेशनही काढण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अनेक शेतकरी भेटत आहेत. या महामार्गातून बागायती क्षेत्र वगळा, अशी मागणी करत आहेत. अनेक शेतकरी 4 ते 5 पट मोबदला द्या, आम्ही तयार आहोत, असेही सांगत आहेत. यामुळे बागायती क्षेत्र कसे वगळता येईल, त्यातून शेतकर्यांचे कमीत कमी नुकसान होईल आणि त्यांना अधिक मोबदला कसा देता येईल, याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शेतकर्यांविरोधात काही करणार नाही, असे यापूर्वीही सांगितलेच होते असे सांगत मुश्रीफ म्हणाले, ज्या शेतकर्यांचा विरोध आहे, त्यांना वगळून हा महामार्ग कसा पुढे नेता येईल, कमीत कमी नुकसान होईल, अशा पद्धतीने नवी अलायमेंट केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक तालुक्याला बाजार समिती करावी असा कायदा नाही, असे सांगत कोल्हापूर बाजार समितीचे विभाजन होणार नाही, असा दावाही मुश्रीफ यांनी केला. करवीर, कागल, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा आणि शाहूवाडी या तालुक्यांसाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच राहील, असेही त्यांनी सांगितले. ज्या तालुक्यांचा प्रस्ताव आहे, त्यांची समिती होईल, कोल्हापूर कृषी उत्पन्न समितीतून वगळून स्वतंत्र समिती स्थापन करावी, असे या सहा तालुक्यांचे प्रस्ताव नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
शहरालगतच्या गावांचा तातडीने हद्दवाढीत समावेश होऊ शकतो. या गावांना घेऊन हद्दवाढ झाली पाहिजे. याकरिता सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटावे लागेल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.