

Shiradhoan farmers electricity issue
शिरढोण : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ नुसार ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीजपुरवठा करण्यात आला आहे. मात्र शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कृषी वीज बिलावर ८ अश्वशक्ती अशी नोंद झाली असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. महावितरण विभागाच्या चुकीमुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान हजारो रुपयांच्या वीज बिलाची टांगती तलवार शेतकऱ्यांवर आहे.त्यामुळे महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.शिरढोण(ता.शिरोळ) येथील विश्वास बालीघाटे यांनी महावितरणच्या अनागोंदी कारभारा विरोधात आवाज उठवला असून या विरोधात शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
शेतीपंप वीज ग्राहकांच्या बिलातील थकबाकी ही पोकळ दाखविली जात आहे. त्याचा फटका शिरोळ तालुक्यातील शेतीपंप धारकांना बसला असल्याचे दिसून येत आहे. महावितरण कृषी पंपाना आठ तास वीजपुरवठा पुरवठा केला जात असल्याचे सांगते. प्रत्यक्षात अनेकदा दोन ते तीन तास वीज पुरवठा बंद केला जातो. शेतकऱ्यांची मागणी आणि प्रत्यक्षात केलेला वीजपुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. शेती पंपाची बिलिंग काढण्यासाठी खासगी कंत्राटदारावर काम सोपविले आहे.
दरम्यान तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या विजबिलावर ८अश्वशक्ती नोंद झाली असल्याने चुकीच्या नोंदीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.त्यामुळे ही चुकीची दुरुस्ती झाल्याशिवाय वीज बिल वसूल करू नये अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
महावितरणने शेतीपंपाचे बिलिंग सरासरीने दुप्पट केले असून अनेक ग्राहकांची बिले परस्पर रिडींग न करता दिली आहेत. नदी आणि विहीरवर न जाता खासगी कंत्राटदाराने कार्यालयात बसूनच बिले काढली असल्याचा प्रकार पुढे येत आहे. जादा भार दाखवून शेतकऱ्यांकडून बिलाची वसुली केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या कृषी वीज बिलावर ८अश्वशक्ती अशी नोंदीबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.त्या दुरूस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्याचे काम सुरू आहे.अशा नोंदी असणाऱ्या शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दाखल करावा याबाबत योग्य कार्यवाही केली जाईल.
विनोद मंदरे, उपकार्यकारी अभियंता कुरुंदवाड महावितरण