Kolhapur Shirdhon pumpkin farmer loss |
शिरढोण : बिरू व्हसपटे
सध्या भोपळा पिकाला किलोमागे केवळ २ रुपये दर मिळत असल्याने हताश होवून शिरढोण (ता. शिरोळ) येथील सचिन पुंडलिक चौधरी या शेतकऱ्याने हातात आलेल्या ३ एकर उभ्या पिकावर नांगर चालवला. तीन एकरातील पीक उध्वस्त करून टाकले आहे. दरम्यान, टाकवडे, जांभळी, हरोली परिसरातील अनेक शेतकरी नुकसानीमुळे, असे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडला आहे.
कष्ट, खर्च आणि मिळकत याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भोपळा पिकाचे दर अचानक पडल्यामुळे या शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. स्थानिक बाजारपेठेत महिनाभरापेक्षा जास्त काळ भोपळ्याला २ रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यामुळे येथील विविध प्रकारचा भाजीपाला पिकवणारे सर्वच शेतकरी हतबल झाले आहेत. याआधीही काहींनी उभ्या भाजीपाला पीकांवर ट्रॅक्टर चालवले आहेत.
येथील शेतकरी सामान्यत: स्थानिक बाजारपेठेत त्यांचा माल विकतात. त्यानंतर तो माल कोल्हापूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर येथील मोठ्या बाजारपेठेत जातो. आता या हंगामात शिरोळ तालुक्यात अनेक हेक्टर क्षेत्रावर भोपळा पिकाची पेरणी झालेली आहे. बाजारात मागणीपेक्षा जास्त भोपळा आल्यामुळे त्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थीक तोट्याला समोरं जावं लागलं आहे. लागणी पासून तोडणीपर्यंत असंख्य अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांनी भोपळा पीक घेतले. मात्र अचानक दर पडल्याने अगदी कष्ठाने पिकवलेल्या पिकावर नजरेसमोर पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च झाला आहे. किलोमागे केवळ २ रुपये दर मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खर्च आणि या पिकातून मिळणारी मिळकत या मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे नुकसानीत शेती करणे जिकरीचे बनले आहे. दरपाडीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
- सचिन पुंडलिक चौधरी,शेतकरी शिरढोण