

Sakal Media False Claim
कोल्हापूर : ‘खोटं बोल, पण रेटून बोल,’ अशी एक अस्सल मराठी म्हण आहे. ‘सकाळ’ने आपल्या अंकाच्या खपाची टिमकी वाजवताना ही म्हण सार्थ केली आहे. कोणतीही तुलना समान बाबीमध्ये व्हायला पाहिजे, हा साधा आणि व्यवहार्य नियम; पण हा नियम धाब्यावर बसवून ‘सकाळ’ने आपल्या सर्व आवृत्त्यांच्या खपाची तुलना ‘पुढारी’च्या फक्त एका सांगली आवृत्तीच्या खपाशी करून वस्तुस्थितीचा विपर्यास नव्हे, तर खोटारडेपणाचा कळसच केला आहे.
‘सकाळ’ने आपल्या खपाचा फुटका ढोल वाजविताना, ‘पुढारी’च्या फक्त एका सांगली आवृत्तीशी तुलना केली आहे. ‘सकाळ’ने आपली जी आकडेवारी सादर केली आहे, ती ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) संस्थेची आहे. ‘पुढारी’च्या फक्त सांगली आवृत्तीचे खपाचे प्रमाणपत्र या ‘एबीसी’ संस्थेचे ‘सकाळ’ने दाखवले आहे. ‘सकाळ’ने ‘एबीसी’ आकडेवारीचा आधार घेताना हातचलाखी करीत ‘एबीसी’च्या दोन्ही आकडेवारीची तुलना केली आहे; पण हे करताना, ‘सकाळ’च्या सर्व आवृत्ती आणि ‘पुढारी’ची फक्त एकच सांगली आवृत्ती यांच्या आकडेवारीची तुलना केली आहे आणि आपला खप अधिक असल्याची खोटी पिपाणी वाजवली आहे. ‘पुढारी’ची एक आवृत्ती विरुद्ध ‘सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांचा खप, अशी वस्तुस्थितीशी विसंगत तुलना करताना ‘सकाळ’ने खोटारडेपणाचा नवा उच्चांकच केला आहे.
विश्वासार्हतेचा उठसूट दावा करणार्या ‘सकाळ’चे पितळ या वास्तवाशी विसंगत आणि विपर्यास्त तुलनेतून उघडे पडले आहे. ‘पुढारी’च्या खपाचे लेखापरीक्षण (ऑडिट) प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया - ‘पीआरजीआय’ - (पूर्वीची रजिस्टार्स ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया - ‘आरएनआय’) - या केंद्र सरकारच्या एकमेव अधिकृत सरकारी संस्थेमार्फत केले जाते. ही संस्था देशातील सर्वच वृत्तपत्रांचे रजिस्ट्रेशन (नोंदणी), रेग्युलेशन (नियमितपणा), सर्टिफिकेशन (प्रमाणीकरण) करते. या संस्थेकडे ‘पुढारी’च्या 2024-25 या आर्थिक वर्षातील विवरणपत्रातील खपाच्या आकडेवारीनुसार, ‘पुढारी’चा खप हा 6 लाख 40 हजार 80 (अक्षरी - सहा लाख चाळीस हजार ऐंशी) एवढा नमूद केला आहे.
स्वत:चा बँड वाजवण्याच्या नादात ‘सकाळ’च्या तथाकथित विश्वासार्हतेचा फुगा फुटला आहे आणि त्यांच्या दाव्याचा बेंडबाजा वाजला आहे. ‘सकाळ’चा खरा खप किती, हे राज्यातील वृत्तपत्रांचे विक्रेते आणि एजंट यांना चांगलेच ठाऊक आहे. ‘बेडूक कितीही फुगला, तरी बैल होत नाही,’ या इसाप नीतीतील कथेची या ठिकाणी आठवण होणे स्वाभाविकच आहे. सुज्ञांना अधिक काही सांगण्याची गरज नाही.
याहीपूर्वी खोटेपणा
यापूर्वी ‘सकाळ’ या वृत्तपत्राने 21 मार्च 2018 रोजी आणि 3 सप्टेंबर 2018 रोजी ‘सकाळ’ हा कोल्हापुरात खपाच्या बाबतीत एक नंबर आहे, अशी खोटी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यावेळी ‘पुढारी’ने ‘एबीसी’कडे तक्रार केली होती व ‘एबीसी’ने कारवाई केल्यानंतर त्यावर ‘सकाळ’ने खुलासा केला होता. आपल्या खपाचा खोटा दावा करण्याची ही ‘सकाळ’ची काही पहिलीच वेळ नाही.