कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सीपीआरला बनावट औषध परवान्याद्वारे 5 कोटी रुपये किमतीच्या सर्जिकल साहित्याचा पुरवठा करणारा न्यूटन एंटरप्रायझेस कंपनीचा मालक अजिंक्य अनिल पाटील (रा. राम गल्ली, त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यासंदर्भातील फिर्याद अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मनोज अय्या यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सरकारी यंत्रणेची फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक, तोतयेगिरी, तोतयेगिरी करून फसवणूक अशा विविध कलमांन्वये हा गुन्हा दाखल झाला आहे. अजिंक्य पाटील याने हेदवडे (ता. भुदरगड) येथील शरद पांडुरंग वैराट यांच्या शौर्य मेडिकल अँड डिस्ट्रिब्युटर्सच्या नावेे असलेल्या मूळ परवान्याच्या इंटिमेशन लेटरच्या नाव व पत्त्यामध्ये बदल केला होता. अन्न व औषध प्रशासन विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त अश्विन ठाकरे यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून शासनाची फसवणूक करून मे. न्यूटन एंटरप्रायझेस, कोल्हापूर या दुकानाचे खोटे व बनावट इंटिमेशन लेटर तयार केले होते. त्याद्वारे सीपीआरला औषधे व सर्जिकल साहित्य पुरवठा करण्याची निविदा मंजूर करून घेऊन याद्वारे 5 कोटी 17 लाख 63 हजार 440 रुपयांच्या सर्जिकल साहित्याचा पुरवठा केला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते जयराज कोळी यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. स्वतः शरद वैराट यांनी भुदरगड, लक्ष्मीपुरी आणि पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर शनिवारी रात्री अकरा वाजता अजिंक्य पाटीलवर अन्न व औषध प्रशासनाने लक्ष्मीपुरी पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
कोल्हापूर, कणकवलीच्या पोलिस ठाण्यांत गुन्हे
संशयित अजिंक्य पाटील याच्यावर यापूर्वी दोन पोलिस ठाण्यांत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
अनेकांचे हात बरबटलेले?
सीपीआर येथील काही वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर यांचेसुद्धा हात यामध्ये बरबटलेले आहेत. याचीदेखील सखोल चौकशी होणे गरजेची आहे. यातून बरेच काही सत्य बाहेर येऊ शकते. ठोस कारवाई झाली, तर पुन्हा अशा गोष्टी करण्याचे कोणी धाडसच करणार नाही, अशी चर्चा आहे.